नितीन नांदगावकरांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती; रुपाली पाटलांची खास फेसबुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 09:43 AM2022-06-07T09:43:50+5:302022-06-07T09:47:51+5:30
गरिबांच्या प्रश्नांना खळ-खट्याकने सोडविण्याची नितीन नांदगावकर यांची स्टाईल मनसेत असताना सर्वपरिचित झाली.
मुंबई- सोशल मीडियावर आपल्या हटकेस्टाईलने प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगांवकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली आहे. नितीन नांदगावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नितीन नांदगांवकर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
गरिबांच्या प्रश्नांना खळ-खट्याकने सोडविण्याची नितीन नांदगावकर यांची स्टाईल मनसेत असताना सर्वपरिचित झाली. आपले काम फेसबुकच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ते पोहोचले आहेत. तर, मुंबईतही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याच्या आंदोलनावेळीही त्यांनी रस्त्यावर उतरुन थेट राणा दाम्पत्यास इशारा दिला होता.
नितीन नांदगावकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे. राजकारणात काय कमावले असेल तर दमदार, विश्वासू भाऊ, बहिणी, मैत्रिणी सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज, डॅशिंग नेते नितीन नांदगावकर, असं म्हणत रुपाली पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, नितीन नांदगावकर यांनी २०१९ मध्ये मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षातून त्या पक्षात आल्यानंतरही त्यांनी त्याच्या स्टाईलने त्याचं काम पुढे नेलं. गरिबांच्या नोकरीसाठी एखाद्या उद्योजकाला भिडणं असो किंवा मुजोर टॅक्सीवाल्याचा समाचार घेणं असो, कोरोना कालावधीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये जाऊन त्यांनी काही रुग्णांची बिले कमी केली होती. त्यामुळे, त्यांच्या कामाची दखल सर्वत्र घेतली जाते. आता, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
रूपाली पाटील यांची राष्ट्रवादीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड-
गेल्या काही महिन्यांपूर्वी मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रूपाली पाटील यांच्यावर विश्वास दर्शवत पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक आक्रमक चेहरा म्हणून रुपाली पाटील यांची ओळख आहे. अन्य पक्षांकडून होणाऱ्या टीकेला रुपाली पाटील जशास तसे प्रत्युत्तर देताना दिसतात. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात आली. त्यावेळी रुपाली पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र, आता रूपाली पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.