राज्यात सुरू असलेली हुकूमशाही जग पाहतेय;सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:08 PM2024-01-18T12:08:06+5:302024-01-18T12:09:12+5:30
ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. ही कारवाई आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई महानगपालिकेमध्ये कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती. सूरज चव्हाण यांनी अनेक कंत्राटदारांना चढ्या दराने कंत्राटं मिळवून दिल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. निर्लज्ज हुकूमशाही आणि त्यांच्या गुलाम यंत्रणांपुढे न झुकणाऱ्या अशा देशभक्तांचा सहकारी असल्याचा मला अभिमान आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सूरज चव्हाण हे नेहमीच सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्या संविधानासाठी उभे राहिले आहेत. सरकारने त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांचा आता छळ होत आहे. लोकशाहीचे हे काळे दिवस, आम्ही लढू आणि जिंकू. आपल्या राज्यात सुरू असलेली हुकूमशाही जग पाहत आहे, असं आदित्य ठाकरेंनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.
Proud to be a colleague of such patriots who don’t bow down to shameless dictatorships and their servile agencies.@isurajchavan has always stood for the truth, democracy, free speech and our constitution. He refused to be bought out by the regime and there he is being harassed.… pic.twitter.com/wbmkm9ZoI5
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 17, 2024
कोण आहेत सूरज चव्हाण?
गेल्या दहा वर्षांपासून सूरज चव्हाण ठाकरेंसोबत काम करत आहेत. सूरज चव्हाण यांना २०१८मध्ये शिवसेना सचिव बढती देण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतर सूरज चव्हाण यांचा त्यांच्या मंत्रालयामध्ये वावर वाढला होता. युवा सेनेने लढवलेल्या विद्यापिठाच्या निवडणुकीत सूरज चव्हाण यांचा महत्त्वाचा सहभाग होता. सूरज चव्हाण यांनी केलेली सूचना हा आदित्य ठाकरे यांचा आदेश असंच पक्षात समजलं जायचं.