कर्नाटकातील हल्ल्यानंतर मनसेनं उपस्थित केली शंका, फडणवीसांना विचारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 09:14 AM2022-12-07T09:14:09+5:302022-12-07T09:14:39+5:30

मनसेनंही शंका उपस्थित करत या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे. 

After the attack in Karnataka MNS Raju Patil also aggressive, asked questions to Fadnavis | कर्नाटकातील हल्ल्यानंतर मनसेनं उपस्थित केली शंका, फडणवीसांना विचारला सवाल

कर्नाटकातील हल्ल्यानंतर मनसेनं उपस्थित केली शंका, फडणवीसांना विचारला सवाल

googlenewsNext

मुंबई - कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावजवळील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या सहा वाहनांना लक्ष्य करत दगडफेक केली, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांना कर्नाटक प्रशासनाने ताब्यात घेतल्याने परिस्थिती चिघळली. महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कर्नाटकात जाणारी एसटी बस वाहतूकही थांबविण्यात आली आहे. तर, राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी ४८ तासांचा अल्टीमेटच दिला आहे. आता, शिवसेनाही याच मुद्द्यावरुन आक्रमक झाली असून मिंधे सरकार प्रत्युत्तर देत नसल्यानेच हा प्रकार होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. तर, मनसेनंही शंका उपस्थित करत या हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली आहे. 

महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी मंगळवारचा आपला दौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे याच मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगाव येथे दाखल झाल्यामुळे तिथे प्रचंड पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील मराठी माणूसही पेटून उठल्याचे दिसून येते, पुण्यात काही कन्नड बसेसना काळं फासण्यात आलं होतं. दुसरीकडे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आक्रमक झाले आहेत. शिवसेनेनं मुखपत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केलाय. मनसेनंही यावर भूमिका घेत सरकारने या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केलीय. 

मनसेचे नेते आमदार राजू पाटील यांनी ट्विट करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे. एकाचवेळी ३-३ ठिकाणी हल्ला होत असल्याने हा हल्ला उत्स्फुर्त आहे की पुरस्कृत याचा सरकारने शोध घ्यावा, गरज पडल्यास केंद्राने चौकशी करावी, अशी मागणीच मनसेनं केली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे ट्विट रिट्विट करण्यात आलं आहे. त्यामुळे, आमदारांच्या भूमिकेला मनसेनंही मान्य केल्याचं दिसून येतं. त्यामुळे, आता राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Web Title: After the attack in Karnataka MNS Raju Patil also aggressive, asked questions to Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.