Join us

संदीप देशपांडे व्हीलचेअरवर अन् मागे राज ठाकरे; व्हिडिओ शेअर करुन मनसेने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 1:29 PM

संदीप देशपांडे जेव्हा डिस्चार्ज घेऊन बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या मागे राज ठाकरे देखील उभे होते.

मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. 

सदर घटनेनंतर संदीप देशपांडे यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी मनसेप्रमुखराज ठाकरे, मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे, नेते नितीन सरदेसाई विचारपूस करण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संदीप देशपांडे यांची विचारपूस केली. तसेच योग्य ते उपचार झाल्यानंतर संदीप देशपांडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 

संदीप देशपांडे जेव्हा डिस्चार्ज घेऊन बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या मागे राज ठाकरे देखील उभे होते. याचदरम्यानचा व्हिडिओ मनसेने शेअर केला आहे. तसेच वाद-प्रतिवाद अपेक्षित पण ही अशी भ्याड हल्ल्यांची संस्कृती महाराष्ट्रात रुजवायचा कुणी प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी कोण उभे आहेत हे हल्लेखोरांनी, त्याच्या सूत्रधारांनी लक्षात ठेवावं, असा इशारा मनसेने दिला आहे. 

दरम्यान, चौकशीसाठी पोलीस पथक संदीप देशपांडे यांच्या घरी दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीप देशपांडे यांना फोन केला असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी संदीप देशपांडे यांना दिलं.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांना सांगितले की, या हल्ल्यामुळे मी घाबरणार नाही. भ्रष्टाचार बाहेर काढत राहणार. आम्ही कुणाला भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत सगळ्यांना माहिती आहे असं त्यांनी म्हटलं. तर संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यातील गुन्हेगार तात्काळ सापडले पाहिजे. पोलिसांनी काम चोख करावं. हल्लेखोरांना अटक करणे आणि त्यांच्यमागे जे कुणी असतील त्यांचाही शोध घेणे गरजेचे आहे. हे घडले त्याचा निषेध जेवढा करू तितका कमी आहे. मनसैनिक संतप्त आहेत. शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी असे होणे अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. कडक शासन झालेच पाहिजे असं मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी म्हटलं. 

टॅग्स :संदीप देशपांडेराज ठाकरेमनसेपोलिस