Join us

ब्रेक-अप केल्याने ब्लेडने तरुणीच्या कापल्या नसा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 10:53 AM

आरोपीला अटक, काळाचौकी येथील घटना.

मुंबई : प्रेमसंबंधांना नकार दिल्याच्या रागात प्रेयसीवर वार केल्याचा प्रकार काळाचौकीमध्ये समोर आला. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. समीर बाळकृष्ण राऊत (४४) असे आरोपीचे नाव आहे. काळाचौकी येथील परशुराम नगर परिसरात राऊत राहण्यास आहे. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये सतत खटके उडत असल्याने तिने संबंध तोडले, मात्र समीरने पुन्हा एकत्र येण्यासाठी तगादा लावला. प्रेयसीचा नकार कायम असल्याने त्याला राग आला.

मंगळवारी तो तरुणीच्या घरी आला. एकत्र येण्यावरून पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. अखेर, रागात समीरने सोबत आणलेल्या ब्लेडने हल्ला चढवला. ब्लेडने तरुणीच्या गळ्यावर व मनगटावर वार करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा झाल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. 

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा :

कुटुंबीयांनी तरुणीला केईएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. आरोपीच्या हल्ल्यात तिच्या हाताच्या नसा कापल्या गेल्या आहेत. डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. घटनेनंतर जखमी मुलीच्या भावाने या प्रकरणाची माहिती काळाचौकी पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी