मुंबई: मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना यांच्यातील मतभेद अनेकदा जाहीरपणे समोर आले आहेत. विशेष म्हणजे कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाचा लोकार्पण कार्यक्रमात शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं स्पष्टपणे दिसून आले होते. या कार्यक्रमात श्रेयवादावरुन बॅनरबाजी बघायला मिळाली होती. तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्या एका विधानामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात वाद रंगण्याची चिन्ह दिसून येत आहे.
आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार का? या विषयावर जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी नाव न घेता टोला लगावला. इतरांची इच्छा असेल तर सोबत राहू. कुणीही राजकीय मग्रुरी दाखवू नये. शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना समजावं, अशा शब्दांत आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
आम्ही सत्ता आणू शकतो, आमची सत्ता होती वगैरे सांगत असेल तर मग प्रत्येकाला लढायचे मार्ग मोकळे आहे, असा इशारा देखी जितेंद्र आव्हाड यांनी दिला. तसेच एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एक सक्षम आघाडी बनवू आणि वर्षोनुवर्षे महापालिका पोखरुन खाललेल्या भाजपला घरी बसवू, असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.