बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला, आता दीपक केसरकरांचं कडूंबाबत मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 05:48 PM2022-10-26T17:48:54+5:302022-10-26T17:49:57+5:30

Deepak Kesarkar: आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यादरम्यान, आता राज्य सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटातील ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी बच्चू कडूंबाबत मोठं विधान केलं आहे.

After the controversy between Bachchu Kadu and Ravi Rana, now Deepak Kesarkar's big statement about Kadu, said... | बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला, आता दीपक केसरकरांचं कडूंबाबत मोठं विधान, म्हणाले...

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला, आता दीपक केसरकरांचं कडूंबाबत मोठं विधान, म्हणाले...

googlenewsNext

मुंबई - एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेले आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, रवी राणा यांच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या बच्चू कडू यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. आता या वादादरम्यान राज्य सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटातील ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी बच्चू कडूंबाबत मोठं विधान केलं आहे. बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते आहेत, लवकरच ते मंत्रिपदी दिसतील, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला असताना त्याबाबत दीपक केसरकर म्हणाले की, बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्षामध्ये दोन आमदार आहेत. त्यामुळे इतर आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर त्यामधील वस्तुस्थिती मला माहिती नाही. बच्चू कडू हे लवकरच मंत्रिपदी दिसतील, अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. मात्र जी व्यक्ती मंत्री बनणार आहे, तिने थोडा संयमही बाळगला पाहिजे, असं मला वाटतं, असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिला. 

दरम्यान. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन देणाऱ्या अमरावती जिल्ह्यतील आ. बच्चू कडू व आ. रवी राणा यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे बच्चू कडू दुखावले आहेत. समर्थनासाठी पैसे (खोके) घेतल्याचा आरोप करणाऱ्या राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे. अन्यथा त्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. आठ ते दहा आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

बच्चू कडू यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत राणा यांच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर येऊन स्पष्ट करण्याची मागणी केली. कडू म्हणाले, पन्नास खोक्यांचा आरोप विरोधकांकडून होत असताना आम्ही दुर्लक्ष केले. पण सत्तेत सहभागी असलेले आ. रवी राणा यांच्याकडून चुकीचे आरोप झाल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. राणांच्या आरोपामुळे शिंदे सरकारला पाठिंबा देणारे इतर आमदारही दुखावले आहेत. आम्ही आठ ते दहा आमदार एकत्र बसणार आहोत. प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशीही आपण चर्चा करू. १ नोव्हेंबरपर्यंत राणा यांनी माफी मागितली नाही किंवा आरोपाशी संबंधित पुरावे दिले नाही तर वेगळा निर्णय घेऊ व बच्चू कडू स्टाईलनेच आरोपांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Web Title: After the controversy between Bachchu Kadu and Ravi Rana, now Deepak Kesarkar's big statement about Kadu, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.