Join us

महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला; एकनाथ शिंदेंनी सुलोचना चव्हाण यांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 3:34 PM

सुलोचना चव्हाण यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई- गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. ९२ व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण   यांनी भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांतील गीते त्यांनी गायिली. पण मराठी सिनेमांमधील लावणी त्यांची खरी ओळख ठरली.

सुलोचना चव्हाण यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घरा-घरांत आणि मना-मनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. श्रीमती चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, सुलोचना चव्हाण यांचा  भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मान केला होता. याशिवाय लता मंगेशकर पुरस्कारानं ही त्यांना सन्मानित करण्यात आले होतं. रंगल्या रात्री चित्रपटासाठी गायली पहिली लावणी गायली होती. ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब आचार्य अत्रे यांच्याकडून प्राप्त झाला.

सुलोचना चव्हाण यांच्या गाजलेल्या लावण्या-

सोळावं वरीस धोक्याचं, पाडाला पिकलाय आंबा, फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा,कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, मला म्हणत्यात पुण्याची मैना अशा अनेक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी गायल्या आणि त्या गाजल्या. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वात पोकळी निर्माण झालीय. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र