मागणी पूर्ण झाल्यावर कोळीबांधवांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांती घेतली भेट
By मनोहर कुंभेजकर | Published: December 18, 2022 05:03 PM2022-12-18T17:03:46+5:302022-12-18T17:04:02+5:30
कोस्टल रोडवरील पूलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा घेतला निर्णय
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही अशी सकारत्मक भूमिका घेत कोळीबांधवांच्या हिताला प्राधान्य देत कोस्टल रोडवरील पूलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय घेत वरळीच्या कोळीबांधवांची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण केली.यामुळे येथील कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
वर्षा निवासस्थानी नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि कोळी बांधव उपस्थित होते.
वरळी जवळून कोस्टल रोड सी लिंकला जोडला जात आहे. तेथील क्लीव्ह लॅण्ड बंदर जवळ दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या कनेक्टरचे काम सुरू असून त्या पिलर मधील अंतर वाढविण्याची मागणी येथील स्थानिक कोळी बांधवांची होती.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कोळीबांधवांची बैठक देखील घेतली . त्यामध्ये यामागणी बाबत तज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार सात सदस्यांची समिती नियुक्त केली होती. समितीने महिनाभरात अहवाल देत अंतर ६० वरून १२० मीटर करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोळीबांधवांची अंतर वाढविण्याची मागणी मान्य करीत या पिलरमधील अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय जाहिर केला.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कुठल्याही विकास प्रकल्पाला गती देताना स्थानिकांची नाराजी असू नये अशी आमची भूमिका आहे. आम्ही लोकहिताच्या निर्णयाला नेहमीच प्राधान्य देत आहोत. त्यानुसार कोळीबांधवांनी केलेल्या मागणीवर सकारात्मक विचार करून हा निर्णय घेतला आहे. पिलरमधील अंतर वाढवल्यानंतर कोळी बांधवांच्या बोटी त्याभागातून सहजपणे ये जा करू शकतील.
यावेळी कोळीवाड्यांचे सीमांकन, पुनर्विकास आदीबाबत चर्चा झाली. कोळीवाड्यांचे सीमांकन लवकरच पूर्ण होईल, असे सांगत कोळीवाड्यांचे हक्क अबाधीत राहतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
दोन पिलरमधील अंतर वाढवण्यासाठी असे झाले होते आंदोलन
महाआघाडीच्या सरकारच्या काळात येथील कोळी बांधवांची भूमिका समजावून न घेता आणि त्यांना विश्वासात न घेतल्याने येथील कोळी बांधव आक्रमक झाले होते.पालिकेने जबरदस्तीने काम करण्याचा प्रयत्न केल्यावर येथील कोळी बाधवांनी 7 डिसेंबर 2021,21 व 22 डिसेंबर 2021,21 मार्च 2022 रोजी समुद्रात आंदोलन करून कोस्टल रोडचे काम बंद पाडले होते.यावेळी पोलिस, कंत्राटदार आणि वरळीचे कोळी बांधव आमने सामने आले होते.मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी येथील कोळी बांधवांची भूमिका मान्य करत त्यांच्या सदर मागणीची पूर्तता केली अशी माहिती वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्यव्यवसाय सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील आणि सचिव नितेश पाटील यांनी लोकमतला दिली. तसेच लोकमतने देखिल सातत्याने हा विषय मांडून येथील मच्छिमारांना अखेर न्याय मिळवून दिल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल आणि मत्स्य अभ्यासक श्वेता वाघ यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीवर आज सकारात्मक निर्णय झाल्याने कोळी बांधवांच्या संस्थांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.