ईडीची धाड अनिल परब यांच्यापर्यंत पोहचल्याने शिवसेनेचे नेते चिंतेत?, राजकीय वर्तुळात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 11:10 AM2022-05-27T11:10:40+5:302022-05-27T11:11:07+5:30
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या अनिल परब यांच्या सारख्या महत्त्वाच्या नेत्यांवर धाड टाकल्यानं शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई- शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालयासह मुंबई, पुणे आणि दापोली (जि. रत्नागिरी) येथे एकूण सात ठिकाणी ‘ईडी’ने गुरुवारी छापे टाकल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तब्बल १२ तासाच्या झाडाझडतीनंतर ‘ईडी’चे अधिकारी परब यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या अनिल परब यांच्या सारख्या महत्त्वाच्या नेत्यांवर धाड टाकल्यानं शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणेनं मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकत कारवाई केली होती. त्यात आता अनिल परब यांच्यापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशी लागल्यानं शिवसेना नेते चिंतेत आणि अस्वस्थ झाले असल्याची चर्चा आहे.
अनिल परब यांच्या पाठीशी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि नेते ठामपणे उभे आहोत. तुम्ही सुडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या, तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. अशा कारवायांमुळे भाजप रोज खड्ड्यात जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून या कारवाया केल्या जात आहेत. परंतु आमच्या मनोबलावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्रातील राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षांत कधी मिळाले नाही. तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहे त्यामुळे राज्यातील राजकीय विरोधकांना अशाप्रकारे नामोहरण करावे, असे कुणाला वाटत असेल, तर शिवसेनेचे मनोबल किंबहुना महाविकास सरकारचं मनोबल कमी होणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी रिसॉर्टची माहिती घेतानाच मूळ जागामालक विभास साठे यांचा जबाबही ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोंदविला आहे. अनिल परब यांचे साई रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्राच्या पर्यावरण विभागाचे एक पथक येऊन पाहणी करून गेले. त्यानंतर हे रिसॉर्ट आपण विकले असल्याचे परब यांनी याआधीच जाहीर केले.
रिसॉर्टची मालकी सदानंद कदमांची-
माझ्यावर छापे टाकण्यामागे दापोलीतील रिसॉर्टचे कारण असल्याचं समोर आलं. त्या रिसॉर्टची मालकी सदानंद कदम यांची आहे. रिसॉर्टमधून समुद्रात सांडपाणी जातं, असा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मग मनी ट्रेलिंगचा विषय कुठं आला?, असं अनिल परब म्हणाले.