चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 02:03 PM2024-10-06T14:03:03+5:302024-10-06T14:41:05+5:30
चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीतील आग दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
CM Eknath Shinde on Chembur Fire : चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली मजली घराखाली बांधलेल्या दुकानाला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत तीन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी या आगीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी होती मात्र नंतर ही संख्या सात झाली. शॉक सर्किटमुळे तळमजल्यावर एका दुकानात आग लागली होती. तर वरच्या घरात गुप्ता कुटुंब राहत होते. अशा स्थितीत दुकानाला आग लागल्याने घरातही आगीचा भडका उडाला. त्यामुळे घरातील वरच्या माळ्यावर असलेले कुटुंबिय जळून खाक झाले. या भीषण घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीत एका मजली घराला पहाटेच्या सुमारास आग लागली. यामुळे एकाच कुटुंबातील ती मुलांसह सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तळमजल्यावरील दुकानाला ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना वाचवता आले नाही. अग्निशमन दलाने सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणली. त्यानंतर आत अडकलेल्या सर्व ७ जणांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.
"गुप्ता परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आगीत सात जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत. झालेल्या घटनेची चौकशी होणार असून योग्य तो निर्णय होईल. परंतु तो पर्यंत कुटुंबाला शासनाकडून प्रत्येक मयत व्यक्तीच्या नावे पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. जखमींवर शासनाच्या माध्यमातून उपचार केले जातील. या बाबतील इतर जे विषय आहेत त्याचा एका बैठकीत निर्णय घेतला जाईल. परंतु पुन्हा याप्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेईल. या परिवाराला तात्काळ प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची निर्णय सरकारने घेतला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे," अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
घराला तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान होते. या दुकानामध्ये रॉकेलचे कॅन ठेवण्यात आले होते. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागली आणि बघता बघता संपूर्ण घरात पसरली. दुकानात लागलेली आग रॉकेलच्या बॅरेल मुळे जास्त भडकली. त्यावेळी छेदिराम गुप्ता व त्यांचा मुलगा धर्मदेव गुप्ता हे घराबाहेर पडले. मात्र घरामध्ये गीतादेवी छेदिराम गुप्ता, अनिता धर्मदेव गुप्ता, विधी धर्मदेव गुप्ता, नरेंद्र धर्मदेव गुप्ता, प्रेम छेदिराम गुप्ता, मंजू प्रेम गुप्ता हे घरातच अडकून पडले. त्यामुळे सर्वजण आगीमुळे होरपळले. स्थानिक आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जखमींना चेंबुरच्या झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.