मुंबई - कोल्हापूर येथे मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर त्याठिकाणी जनजीवन सुरळीत करण्याच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे.
पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे स्वच्छ करण्यासाठी मुंबईहून कोल्हापुरात दाखल झालेल्या चमुमार्फत कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. याठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेनेही खारीचा वाटा उचलला आहे.
कोल्हापूर येथे पर्जन्य जलवाहिन्या वाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. कोल्हापूर शहरातील स्वच्छतेसाठी दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर यंत्राची मदतीकरिता देण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर गगराणी यांच्या निर्देशानुसार तातडीने स्वच्छतेच्या कामासाठी चमू रवाना करण्यात आला. या चमुने कोल्हापुरातील शाहुपुरी या भागात काम सुरू केले आहे.
प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभागाने कनिष्ठ अभियंता आकाश रैनाक यांच्या नेतृत्त्वाखाली दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर संयंत्रे कोल्हापूरकरीता ३० जुलै रोजी रवाना केले. या चमुमध्ये प्रत्येक संयंत्रासोबत चार जणांचे मनुष्यबळ आहे. दोन्ही संयंत्रांसोबत एकूण ८ जण कोल्हापुरात आज दाखल झाले. या चमुमध्ये वाहन चालक, तंत्रज्ञ, कामगार यासारख्या मनुष्यबळाचा समावेश आहे.
२०१९, २०२१ मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुरळीत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती