मुंबई - १ एप्रिल २०२३ नंतर जन्माला येणारी महाराष्ट्रातली लेक आता लखपती होणार आहे. राज्यातल्या आपल्या महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे या सर्वसमावेशक महिला सशक्तीकरणाच्या हेतूने सरकारने घेतलेला हा निर्णय आहे असं सांगत भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, एका कुटुंबात एक मुलगी असो किंवा दोन मुली जन्माला येवो, त्या दोघींनाही हा लाभ मिळणार आहे. मुलगी जन्मल्यानंतर ५ हजार रु., पहिलीला गेली की ६ हजार रु., सहावीला गेली की ७ हजार रु. अकरावीला गेली की ८ हजार रु. आणि १८ वर्षांची झाली की ७५ हजार रु. असा लाभ आमच्या ताईला मिळणार आहे. या पद्धतीने एकूण १ लाख १ हजार रु. मिळवत आपल्या राज्यातल्या या लाडक्या लेकी लखपती होणार आहेत असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मार्च २०२३ अर्थसंकल्पीय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री आमचे नेते-राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ‘लेक लाडकी योजनेची’ घोषणा केली होती. आणि आता ही योजना अंमलात येत आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चित्रा वाघ यांनी आभार व्यक्त केले आहे.