शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज?; उद्धव ठाकरेही होते उपस्थित, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 05:01 PM2022-07-11T17:01:33+5:302022-07-11T17:07:09+5:30
शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर खासदार संजय राऊत नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची उघड भूमिका शिवसेनेच्या काही खासदारांनी मांडली होती. त्यानंतर आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्ही सर्व खासदारांसोबत बोलून नक्की कोणाला पाठिंबा द्यायचा, यावर निर्णय घेऊ, असं शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्व खासदारांचं मत जाणून घेण्यात आलं.
भाजपाकडून द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांचा पाठिंबा यशवंत सिन्हा यांनाच राहावा, अशी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची इच्छा होती. मात्र मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी भाजपाच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका मांडल्याचे सांगण्यात येत आहे. खासदारांच्या या भूमिकेवर संजय राऊत नाराज झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
संसदेतील शिवसेनेच्या २२ खासदारांपैकी केवळ १५ खासदार आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थितीत आहेत. त्यामध्ये राज्यसभेतील संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी या खासदारांचा समावेश आहे. तर लोकसभेतील १९ पैकी अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर, विनायक राऊत, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, प्रतापराव देशमुख, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, राजेंद्र गावित, ओमराजे निंबाळकर आदी १२ खासदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील, कृपाल तुमाने आणि कलाबेन डेलकर हे खासदार या बैठकीला अनुपस्थित आहेत. तर राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई हे दिल्लीत असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. खासदारांच्या दबावानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.