Join us

Video: तृतीयपंथीयांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आ. नितेश राणेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 1:59 PM

पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते.

मुंबई/पुणे - महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा खेळखंडोबा सुरु आहे. राजकीय नेत्यांकडून टीकाटिप्पणी बरोबरच वादग्रस्त वक्तव्येही केली जात आहेत. काही जणांकडून तर अक्षरशः संतापजनक वक्तव्ये वरिष्ठ नेत्यांबद्दल केली जाऊ लागली आहेत. नुकतेच, आमदार नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं. हे बघा हिजड्यांचे सरदार असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राणेंनी केलेल्या टीकेनंतर पुण्यात तृतीयपंथी आक्रमक झाले आहेत. त्यानंतर, आमदार नितेश राणेंनी व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. 

पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे तृतीयपंथींनी मध्यरात्रीपासून आंदोलन सुरु केले आहे. सकाळी आंदोलन सुरु असताना पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यात झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी  पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. तर, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही बंडगार्ड पोलीस स्टेशनला जाऊन नितेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी पोलिसांकडे केली. 

नितेश राणेंनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. तृतीयपंथीय समाजाने माझं संपूर्ण वक्तव्य ऐकलेलंच नाही, असं मला वाटतं. काँग्रेससमोर झुकणारे हे सगळे हिझडे असतात, असं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत बोलताना म्हटले होते. त्या विधानाचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत. त्यामुळेच, मी बाळासाहेबांच्या त्या विधानाचा संदर्भ देत हे विधान मी पत्रकार परिषदेत केलंय. कारण, उद्धव ठाकरे जे आता काँग्रेससमोर झुकले आहेत, २०१९ पासून झुकत आहेत, ते हिझड्यांचे प्रमुख आहेत, असे आमदार नितेश राणेंनी म्हटलंय.  

दरम्यान, पुण्यात तृतीयपंथीयांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून सुषमा अंधारे यांच्यानंतर विधिज्ञ असीम सरोदे यांनीही आंदोलनात सहभागी होत पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास आम्ही उच्च न्यायालयात जाऊस, असेही त्यांनी म्हटलंय. 

टॅग्स :नीतेश राणे पुणेशिवसेनाउद्धव ठाकरे