Join us

शिवसेनेच्या दणक्यानंतर अखेर ओशिवरा नदीवरील संरक्षण भिंतीचे काम सुरु

By मनोहर कुंभेजकर | Published: June 07, 2023 6:43 PM

गोरेगावच्या ओशिवरा नदीला लागून रेल्वे पूलाच्या पश्चिमेस जवाहरनगर झोपडपट्टी आहे.

मुंबई:  ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गोरेगाव पश्चिम जवाहर नगर येथील ओशिवरा नदीची संरक्षण भिंत तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे नदीलगतच्या झोपडपट्टीत राहणा-या शेकडो कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला होता. या पार्श्वभूमीवर ओशिवरा नदीलगतची संरक्षक भिंत तात्काळ दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे देण्यात आला होता. लोकमतने या संदर्भात दि,३१ मे च्या लोकमत ऑनलाईन आणि लोकमतच्या गुरुवार दि,१ जूनच्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते.

शिवसेनेच्या दणक्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून काल पासून या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे रहिवासीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असल्याची माहिती शिवसेनेचे गोरेगाव विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी लोकमतला दिली.

गोरेगावच्या ओशिवरा नदीला लागून रेल्वे पूलाच्या पश्चिमेस जवाहरनगर झोपडपट्टी आहे. येथे शेकडो कुटुंब राहतात. नदीची संरक्षक भिंत तुटल्यामुळे पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास येथील घरात पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची भीती रहिवाशीयांना सतावत होती. यासंदर्भात महानगरपालिकेच्या मध्यवर्ती यंत्रणा (सेंट्रल एजन्सी) विभागाला तक्रार देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. 

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि  दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी गेल्या आठवड्यात ओशिवरा नदीची पाहणी केली होती. तसेच संरक्षक भिंतीच्या दुरूस्ती करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. शिवसेनेच्या दणक्यानंतर काल पासून पालिकेच्या सेंट्रल एजन्सीच्यावतीने संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रहिवासीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून शिवसेनेचे आभार मानले आहेत. 

यावेळी विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे, शाखाप्रमुख कमलाकांत नांदोस्कर, उपशाखाप्रमुख गंगाराम वैती, गटप्रमुख  बाळा नायडु, साजिद शेख, अनिल सागवेकर, सिंधु लंका, कुमार भावे, उपशाखासंघटक रजनी लाड, रंजना वैती, अलका दळवी, दुर्गा सिंग, विजया लंका, शैला आलारे, तुकाराम तोडलेकर, सुनिता गावकर, दुर्गा सिंग, गुड्डू राजभर, शैला आचारे, महेंद्र इगवे यांच्यासह मध्यवर्ती यंत्रणा पी/ दक्षिणप्रज्यल्य जलवाहिनी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई