जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर होणार

By सचिन लुंगसे | Published: December 1, 2022 02:10 PM2022-12-01T14:10:29+5:302022-12-01T14:10:47+5:30

महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवस्था नुकतीच सुरू केली आहे...

After the purchase of the old house, the electricity connection will automatically be in the name of the new owner | जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर होणार

जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर होणार

googlenewsNext

मुंबई : एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची धावपळ बंद होऊन आपोआप कनेक्शन धारकाच्या नावात बदल होण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन व्यवस्था नुकतीच सुरू केली आहे. 

एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली की त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात असे. महावितरणने यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करता येतात. परंतु, या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात होता. ग्राहकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता.

नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश पाठविला जातो, त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविले जाते. हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाईनही भरू शकतो. फी भरली की विजेचे कनेक्शन नावावर होते आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नव्या मालकाच्या नावाने पाठविले जाते.

एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज कनेक्शन ट्रान्स्फर करायचे याची निवड करण्यास सांगितले जाते. कारण विजेचे कनेक्शन एकच व्यक्ती किंवा संस्थेच्या नावे असू शकते. नव्या प्रक्रियेत वीज कनेक्शन नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, पडताळणी करणे व पाठपुरावा करणे हे सर्व कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नवीन व्यवस्थेची चाचणी नुकतीच यशस्वी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ईज ऑफ लिव्हिंग’चा संदेश आहे. त्यानुसार योजना राबविण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशा प्रकारे ग्राहकांना वीज कनेक्शन आपोआप बदलून मिळण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून आता ग्राहकांना या नवीन सेवेचा लाभ घेता येणार आहे.
- विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’च्या सूचनेनुसार हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
 

Web Title: After the purchase of the old house, the electricity connection will automatically be in the name of the new owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.