Join us  

खासदारांच्या पाठींब्यानंतर संजय राऊतांची 'खंजीर' शायरी, बाळासाहेबांचा फोटोही केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 6:36 PM

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या शिवसेना बंडांवरुन आणि सत्तांतरावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे

मुंबई - शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर पाहायला मिळालं. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, आता 12 शिवसेनाखासदारांचाही गट एकनाथ शिंदे गटात सहभागी होत आहे. राजधानी दिल्लीत आज एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांची भेट घेतली. शिवसेनेतील बंडाच्या या राजकीय घडामोडीत खासदार संजय राऊत हे केंद्रस्थानी आहेत. आता, ते खासदारांवरही टिकास्त्र सोडत आहेत. त्यातूनच त्यांनी ट्विट करुन शिवसेना खासदारांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या शिवसेना बंडांवरुन आणि सत्तांतरावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असं आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहण्यास मिळतं आहे. त्यात, शिवसेनेकडून संजय राऊत एकटे खिंड लढवत आहेत. तर, शिंदे गटाकडून अनेकजण संजय राऊतांवर आरोप करत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळेच, त्यांनी केलेल्या टिकेमुळेच हे 51 आमदार शिंदेगटात कायम राहिले आणि सरकार बनले, असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आजही संजय राऊत शिंदे गटावर त्यांच्यास्टाईलने हल्लाबोल करत आहेत. 

“शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. सामना प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जी व्यवस्था केली आहे, त्यानुसार हे चालतं. त्यांना महाराष्ट्र तोडायचाय म्हणून शिवसेना तोडायची आहे. उद्या म्हणतील मातोश्रीत जातो, त्यांचा काही भरवसा नाही. नशेची, सत्तेची भांग प्यायलेली लोकं काहीही करू शकतात. उद्या मातोश्री आमचं आहे म्हणत कब्जाही करू शकतात. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापनच केली नाही असंही ते म्हणू शकतात. अशी यांची वैचारिक पातळी उंचावली आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला होता. आता, एका ट्विटमधून त्यांनी शिवसेना खासदारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.  संजय राऊत यांनी शायरीच्या माध्यमातून बंडखोरांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं म्हटलं आहे. पाठीत मारलेल्या खंजीरांची संख्या मोजली, तेव्हा तेवढीच होती, जेवढ्यांना आम्ही मिठी मारली होती, अशा आशयाची शायरी राऊत यांनी ट्विट केली आहे.

 

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतएकनाथ शिंदेखासदार