मुंबई : पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या गोराईकरांना टँकरमुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी जलवाहिन्यांच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली. ही गैरसोय गोराई मनोरीतील लोकांसाठी नवी डोकेदुखी झाली आहे. पावसाळा अगदी तोंडावर आला असताना रस्ता कच्चाच ठेवल्यामुळे ऐन पावसाळ्यात येथून चालणे लोकांसह वाहनचालकांना त्रासाचे ठरणार आहे.
मनोरीत नुकतेच पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, हे काम ज्या कंत्राटदाराला दिले होते, त्याने रस्ता पूर्ववत केला नाही. त्यामुळे येथील रस्ता मातीचा आणि कच्चा झाला आहे. खरंतर पावसाळ्यापूर्वी रस्ता पक्का होणे आवश्यक आहे. मुळात या भागातील रस्ते चिंचोळे आहेत. येथून प्रवासी वाहतूक करणारे टांगेही धावत असतात. शिवाय अन्य वाहनांची वर्दळ असते. पावसाळा सुरू झाल्यास मातीचा रस्ता वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. मात्र, एकदा का काम झाले की थातुर मातुर कामे करून रस्ता पूर्ववत केल्याचे भासवले जाते. असे रस्ते काही दिवसांतच उखडतात, असा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे मनोरीत काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत का केला गेला नाही, संबंधित कंत्राटदारावर पालिका काय कारवाई करणार, असा सवाल वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेन्टा यांनी केला.
कायमच नागरी सुविधांची वानवा-
१) गोराई आणि मनोरी या भागात कायमच नागरी सुविधांची वानवा राहिली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत हे भाग असूनही म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. २) गेली दोन वर्षे गोराईतील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
३) पाण्यासाठी स्थानिकांना न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. त्यानंतर पालिकेने दिवसाला २० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू केला आहे.