५० वर्षांनी घर मिळाले आणि आसवांचा बांध फुटला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 09:44 AM2024-01-09T09:44:55+5:302024-01-09T09:46:00+5:30

संक्रमण शिबिरातील १६ रहिवाशांना मिळाल्या घराच्या चाव्या

after thee 50 years to getting own house people going to emotional | ५० वर्षांनी घर मिळाले आणि आसवांचा बांध फुटला...

५० वर्षांनी घर मिळाले आणि आसवांचा बांध फुटला...

मुंबई : गेल्या ५० वर्षांपासून शिव येथील संक्रमण शिबिरात राहणाऱ्या दुर्गादेवी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांना अखेरीस हक्काचे घर मिळाले आहे. ३६ पैकी १६ रहिवाशांनी घराचा ताबा घेतला, तेव्हा त्यांच्या आसवांचा बांध फुटला. रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी ‘लोकमत’ने वाचा फोडली होती. त्यामुळे सर्वजण ‘लोकमत’चे आभार मानत होते. 

‘लोकमत’ने गेल्या वर्षी यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्याची दखल घेत सरकारला यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अध्यक्षांच्या निर्देशांची गंभीर दखल घेतली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संबंधित इमारतीत ४८ रहिवासी होते. पाडकामानंतर रहिवाशांची रवानगी संक्रमण शिबिरात झाली. ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशांनंतर गती मिळाली. याचवेळी माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या मदतीने म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे माजी सभापती विनोद घोसाळकर यांच्या दालनात रहिवासी आणि म्हाडा अधिकाऱ्यांमध्ये बैठका होत होत्या. काही रहिवाशांच्या कागदपत्रांतील तांत्रिक अडचणींमुळे घराचा ताबा मिळत नव्हता. 

गिरगाव विभाग क्रमांक १२ चे तत्कालीन विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या मदतीने खासदार अरविंद सावंत यांची भेट घेण्यात आली. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या दालनात याप्रश्नी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत संजीव जयस्वाल यांनी इमारतीचे काम पूर्ण करत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रहिवाशांना घरांचा ताबा द्यावा, असे आदेश दिले. गिरगाव येथील दुर्गादेवी सहकारी गृहनिर्माण संस्था  म्हाडा पुनर्रचित इमारतीचे उद्घाटन, चावी वाटप कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी खा.अरविंद सावंत यांच्यासह म्हाडा अधिकारी सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, उपमुख्य अधिकारी विराज मडावी, मिळकत व्यवस्थापक अवधूत बेळनेकर, विशाल बिराजदार, उमेश माळी, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

नवे घर मिळावे म्हणून आम्ही म्हाडा अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेतल्या. तांत्रिक कारणांसह अनेक घटकांमुळे ताबा प्रक्रिया रखडली होती. हा प्रश्न ‘लोकमत’ने मांडल्यानंतर समस्येची दखल घेतल्याने न्याय मिळाला.- गणेश शिंदे, सचिव, दुर्गादेवी सहकारी गृहनिर्माण संस्था  

घटनाक्रम... 

  १९७४ - इमारत धोकादायक म्हणून रिकामी करत पाडण्यात आली.
  २००८ - म्हाडाने टेंडर काढत सतीश कन्स्ट्रक्शनला काम दिले.
  इमारत बांधून १५ पेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली.
  म्हाडाचे दुर्लक्ष झाल्याने बांधकाम चुकीचे झाले.
  इमारतीचे प्रवेशद्वार केवळ साडेपाच फुटांचे बनविण्यात आले.
  २०१८ - विनोद घोसाळकर म्हाडाचे सभापती असताना म्हाडाकडून ३९ रहिवाशांची लॉटरी काढण्यात आली.
  २०१९ - म्हाडामध्ये मूळ कागदपत्रे जमा करण्यात आली. देकार पत्रे देण्यात आली.

Web Title: after thee 50 years to getting own house people going to emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.