"टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही, तर अबू आझमींकडून आली होती"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 10:45 AM2022-06-09T10:45:29+5:302022-06-09T10:46:09+5:30
उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी निशाणा साधला आहे.
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपासह औरंगाबाद शहरातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. पाणीप्रश्नाला मी सामोर जातोय, कुठेही फसवेगिरी नाही. मी प्रामाणिक आहे. पूर्वी दहा दिवसांपूर्वी पाणी यायचं आता हे दिवस कमी कमी होत चालले आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
सभेला येताना प्रशासकीय अधिकारी भेटले. झारीतले शुक्राचार्य त्यांना बाहेर फेका आणि माझ्या संभाजीनगरच्या लोकांना पाणी द्या असं अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. पाणी योजनेसाठी मी पैसे देण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या वतीने देणार आहे. योजनेसाठी पैसे कमी पडून देणार नाही. परंतु योजनेला विलंब झाला तर दया, माया न दाखवता कंत्राटदाराला तुरुंगात टाका असा आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंच्या या भाषणानंतर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी निशाणा साधला आहे.
या वेळच्या टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही तर अबू आझमींकडून आली होती. ३ दशकांपासून शिवसेनेचा महापौर, आमदार, खासदार असूनही ना पाणी प्रश्न सोडवता आला ना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करता आले, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.
या वेळच्या टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही तर अबु आझमीकडून आली होती ..
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 9, 2022
३ दशकांपासून सेनेचा महापौर,आमदार,खासदार असूनही ना पाणी प्रश्न सोडवता आला ना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करता आले.
"काँग्रेस,राष्ट्रवादीच्या पिंज-यात वाघ सापडे,हिंदू व मराठी जनता मारती खडे" pic.twitter.com/MRxHdYER86
दरम्यान, हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, काश्मीर पंडितांची रक्षण करणारी शिवसेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे म्हणून ही जनता माझ्यावर प्रेम करतेय. मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. बाबरी मशीदीचं आंदोलन करताना जो हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा नारा होता. बाबरी पाडण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तुम्ही संसदेत कायदा केला नाही. तुमचं हिंदुत्वासाठी कर्तृत्व काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.