Join us

साडेतीन वर्षांनंतर लोकलची प्रवासी संख्या पूर्ववत होण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 7:04 AM

कोरोनानंतर झाली हाेती घट, पुन्हा आशादायी चित्र

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांची संख्या साडेतीन वर्षांनंतर कोरोनापूर्व पातळीवर परत येत आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर दररोज सरासरी सुमारे ६६.६१ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षांत दररोज प्रवास केलेल्या प्रवाशांची सरासरी संख्या ६५.३७ लाख एवढी होती  होती, असे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकत्रित आकडेवारीवरून स्पष्ट होते. ही प्रवासी संख्या जरी कोरोनापूर्वीच्या संख्येपेक्षा १५ टक्के कमी असली तरी प्रवासी पुन्हा मध्य व पश्चिम रेल्वेकडे वळत असल्याचे दिसते. 

मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमुळे लोकल सेवा अनेक महिने बंद होती. त्यामुळे रेल्वे प्रवासी निम्म्याहून अधिक घटले होते. तसेच २०२३ मध्ये मेट्रो मार्ग २ अ आणि ७ तसेच २०२४ मध्ये आरे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यानच्या मेट्रो ३ कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासह शहरातील चार मेट्रो रेल्वे कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यानंतरही गेल्या २-३ वर्षांमध्ये रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. 

उपनगरीय लोकलची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि चर्चगेट ही सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत. ऑगस्टमध्ये, सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकात दररोज सुमारे अनुक्रमे ५,६९,००० आणि ४,३२,००० प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर ठाणे, कल्याण, पनवेल, बोरिवली, विरार आणि भाईंदर यांसारख्या दूरच्या उपनगरांमधील स्थानकांमध्येही दररोज सरासरी सुमारे दोन लाखांहून जास्त प्रवाशांची वर्दळ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

गेल्या काही वर्षांत विनातिकीट प्रवाशांची संख्याही वाढली आहे. अशा प्रवाशांची संख्या सुमारे ३० टक्क्यांहून अधिक असल्याचे रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबई लोकल