लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : म्हाडातर्फे २०२० मध्ये गिरणी कामगारांकरिता काढण्यात आलेल्या सोडतीतील बॉम्बे डाइंग व श्रीनिवास मिलमधील ४३६ पात्र गिरणी कामगार, वारस यांना घरांच्या चाव्या गुरुवारी म्हाडा मुख्यालयात देण्यात आल्या.
म्हाडा व गिरणी कामगार संनियंत्रण समिती यांच्या वतीने झालेल्या कार्यक्रमाला गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, सहमुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे, कामगार आयुक्त सतीश देशमुख, कामगार उपायुक्त शिरीन लोखंडे, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन, मिळकत व्यवस्थापक रामचंद्र भोसले उपस्थित होते.
दरम्यान, उर्वरित यशस्वी पात्र ठरणाऱ्या गिरणी कामगार, वारस यांना ऑक्टोबर २०२३ पर्यंत चाव्या दिल्या जातील. अद्यापपर्यंत ३,८९४ पैकी ८५६ यशस्वी पात्र गिरणी कामगार, वारस यांना चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. ३०३८ गिरणी कामगार, वारस यांची पात्रता निश्चित करण्याचे काम सुरू आहे. पात्रता निश्चित करून त्यांना चाव्या दसऱ्यापर्यंत दिल्या जातील.