मुंबई : बाळंतपणातील गुंतागुंतीमुळे २६ आठवड्यांच्या एका गरोदर महिलेची प्रसूती कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली. मुदतपूर्व प्रसूतीत देशातील सर्वांत कमी वजनाच्या बाळाला तिने जन्म दिला. या बाळाची (स्वरा) आणि तिची आई श्रेया संतोष शिंदे यांची प्रकृती आता ठणठणीत असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कोकिलाबेन अंबानी रुग्णालय प्रशासनाने दिली.‘स्वरा’चे जन्मत: वजन अवघे ४५५ ग्रॅम होते. मात्र, रुग्णालयाने वजन वाढविण्यासाठी तिच्यावर प्रचंड मेहनत घेतली. तिला चार महिने ‘एनआयसीयू’मध्ये ठेवण्यात आले होते. कृत्रिम श्वासोच्छ्वास, तसेच नलिकेद्वारे तिला अन्न देण्यात येत होते. या उपचारांमुळे ११० दिवसांनंतर स्वराचे वजन २.५ किलो झालेआहे.>बाळासह आईदेखील सुरक्षितयाबाबत कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. राम नारायण यांनी सांगितले की, ‘एनआयसीयू’ विभागात दाखल नवजात शिशुंचे प्राण वाचविणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे. तंत्रज्ञान आणि कौशल्याद्वारे रुग्णाला नवीन आयुष्य देण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर आणि संपूर्ण व्यवस्थापन कटिबद्ध आहे. प्रसूतीपूर्व, तसेच प्रसूतीनंतर निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीवर मात करण्यासाठी येथील डॉक्टरांचे पथक सदैव सज्ज असते. त्यामुळेच स्वरा आणि तिची आई सुरक्षित असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे.
उपचारांनंतर ‘स्वरा’ला रुग्णालयातून डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 5:31 AM