दोन महिन्यांनी उद्धवसेनेच्याच उमेदवाराशी दोन हात करावे लागणार
By रेश्मा शिवडेकर | Published: April 16, 2024 07:34 AM2024-04-16T07:34:17+5:302024-04-16T07:35:33+5:30
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मविआची कसोटी
रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मोदी सरकारच्या विरोधात खांद्याला खांदा लावून उभ्या राहणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांची लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच जूनमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. कारण गेली १८ वर्षे या मतदारसंघातून निवडून येणारे ‘शिक्षक भारती’चे कपिल पाटील हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांच्या पक्षातर्फे उभ्या ठाकलेल्या उमेदवाराला दोन महिन्यांनी उद्धवसेनेच्याच उमेदवाराशी दोन हात करावे लागणार आहेत. तेव्हाही दोहोंपैकी कोण आघाडी धर्म पाळत माघार घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
उद्धव सेनेतर्फे गोरेगावमध्ये रविवारी सायंकाळी पार पडलेल्या ‘युवा राष्ट्राभिमान’ मेळाव्याच्या व्यासपीठावर कपिल पाटीलही उपस्थित होते. मोदी सरकारच्या विरोधात हिरीरीने भूमिका मांडत त्यांनी सेनेचे उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना निवडून देण्याचे जोरदार आवाहन उपस्थितांना केले. पाटील यांनी जूनमध्ये होणारी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यांच्या शिक्षकभारतीने निवडणुकीतून अद्याप माघार घेतलेली नाही. पाटील यांच्याऐवजी सुभाष मोरे ही निवडणूक लढवणार आहेत.
दुसरीकडे या निवडणुकीकरिता उद्धवसेनेने ‘शिक्षक सेने’चे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर या माजी सनदी अधिकाऱ्याच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांना निवडून आणण्याकरिता उद्धवसेना जोरदार कामाला लागली आहे. विशेष अभ्यंकर यांच्या विजयाला शिक्षक भारतीचाच एक गट हातभार लावत आहे. पाटील यांच्याशी न पटल्याने शिक्षक सेनेला येऊन मिळालेले शिक्षक नेते जालिंदर सरोदे यांच्या नेतृत्त्वाखाली गट सध्या मुंबईतील शाळाशाळांना भेटी देऊन मतदार नोंदणी करत आहे. या विरोधाभासाबाबत ‘शिक्षक भारती’चे नेते सुभाष मोरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आपला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा अजिबात विचार नसून घटक पक्षांनी आघाडीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे.
धर्म पाळावा मोदींना हरवण्याकरिता आम्ही महाविकास आघाडीत सहभागी झालो आहे. आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांचा सन्मान करत आघाडी धर्म पाळावा. - सुभाष मोरे
त्यांची वेगळी चूल
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जद(यू) ने पुन्हा एकदा भाजपाशी सलगी केल्यानंतर या पक्षाची महाराष्ट्रात खासकरून मुंबईत धुरा वाहणारे शिक्षक आ. कपिल पाटील यांनी महाराष्ट्रातील समाजवादी जनता परिवाराला एकत्र करण्याकरिता मार्चमध्ये समाजवादी गणराज्य पार्टीची (सगपा) स्थापना केली.