मुंबई - मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडवरून भाजप आणि शिवसेनेत कायम संघर्ष झाल्याचे दिसून आले आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आपल्या मनातील भावना त्यांनी व्यक्त केल्या. ज्या पद्धतीने नवे सरकार स्थापन झाले आहे, त्याबाबतही रोखठोक मत व्यक्त केले. तसेच आरे कारशेड संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयावर उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली भूमिका मांडली आहे.
आरे मेट्रो कारशेड प्रकल्प करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी सरकार घेईल. सर्व बाबी तपासल्या जातील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे जनतेच्या हिताचं आहे, राज्य सरकारच्या हिताचं आहे, लोकांना, नागरिकांना त्या प्रकल्पाचा फायदा लवकरात लवकर होईल, यासाठी जे जे करावे लागेल, ते आम्ही करू, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितले.
कारशेडबद्दल काय म्हणाले फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर फडणवीसांनी एका वाक्यात भूमिका मांडली. आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. उद्धव ठाकरे यांचा आदर आणि मुंबईकरांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या प्रश्नावर बोलताना दिली.
माझ्यावर राग काढा, मुंबईवर नको
माझ्यावर राग असला तरी चालेल. पण माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबई मेट्रोची आरे कारशेड ही पर्यावरणासाठी योग्य नाही. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. ही जागा निश्चित करण्यात आली. तेव्हा एकाच रात्रीत शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. ही कारशेड झाली तर तेथील वन्यजीव आणि वनजीवनाला मोठा धोका निर्माण होईल. आता तेथे कारशेड झाल्यास ते पुढे पुढे वाढत जाईल आणि आरेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. पर्यावरणाच्या दृष्टिने विचार करूनच मुंबई मेट्रोची कारशेड आरेमध्ये नको, या निर्णय घेत माझ्या पहिल्या मंत्रिमंडळात यावर स्थगितील दिली होती. कांजूरमार्गची जागा अनेकार्थाने चांगली आहे. त्यामुळे कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव नाकारू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.