Join us

"...तर पुढचे संपूर्ण आयुष्य ठाकरे अन् त्यांच्या कुटंबीयांना खाली मान घालून जगावे लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 4:25 PM

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरुन आता भाजपाही आक्रमक झाला आहे.

मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका काल देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्याला आज उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांत उत्तर दिलं. "देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. 

आज उद्धव ठाकरेंनी दादर येथील श्री शिवाजी मंदिर सभागृहात उपस्थित मुंबईतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. कोरोनाकाळात मोदींनी नुसत्या थाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या. ऑक्सिजन देताना काय काय घडले ते सर्वांना माहिती आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे. अनेकांच्या गोष्टी अनेकांकडे आहेत. उद्धव ठाकरे खलनायक आहे की नाही जनता ठरवेल. पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला माहिती आहे, असे ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरेंच्या या टीकेवरुन आता भाजपाही आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज केलेली वैयक्तिक आणि घाणेरडी टीका ठाकरे यांचे मानसिक संतुलन आता पूर्णतः ढळले असल्याचे द्योतक आहे, असं भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडद्वारे म्हटलं आहे. काही दिवसांपासून ठाकरे यांच्या या वायफळ बडबडीमुळे त्यांच्या तब्येतीबद्दल अनेकांच्या मनात असंख्य शंका होत्या. पण ते आता मानसिकदृष्टया रुग्ण असल्याचा सर्वात मोठा पुरावा आज महाराष्ट्रातील जनतेला मिळाला असल्याचंही भाजपाने म्हटलं आहे. 

ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर देवेंद्र फडणवीस यांनी कधीही अशी टीका केली नाही. तो त्यांचा स्वभाव नाही. मुख्यमंत्री असताना देवेंद्र जी यांनी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी काय काय केले. या गोष्टी सांगितल्या तर पुढचे संपूर्ण आयुष्य ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना खाली मान घालून जगावे लागेल, असा इशारा देखील भाजपाने यावेळी दिला. उद्धव ठाकरे हे हवापालट करण्यासाठी मध्यंतरी परदेशात जाऊन आले. ते नेमके फिरायला गेले होते की मानसिक उपचारासाठी गेले होते? हा एक संशोधनाचा विषय आहे, असं भाजपाने म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर-

"मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेभाजपा