अनलॉकनंतर भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:17+5:302021-06-22T04:06:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना आता अनलॉकनंतर पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाला महागाईला सामोरे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना आता अनलॉकनंतर पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाला महागाईला सामोरे जावे लागत आहे. मागील महिनाभरात भाजीपाला २५ टक्क्यांनी महाग झाल्यामुळे आता बाजारात गेल्यानंतर सर्वसामान्यांना खिसा मोकळा करावा लागत आहे. रोजच्या जेवणात वापरण्यात येणारा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, पालेभाज्या, कडधान्य असा सर्व प्रकारचा भाजीपाला महागला आहे. यामुळे आता या महागाईत जगावे तरी कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिला आहे.
पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यामुळे आता शेतातून भाजीपाला बाजारात येईपर्यंतचा प्रवास खर्च वाढला आहे. त्याचप्रमाणे यंदा लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवडदेखील कमी केली आहे. त्यामुळे मुंबईच्या जवळपास असणाऱ्या परिसरांमधून येणारा भाजीपाला आता पुणे, सातारा, नाशिक या ठिकाणांहून येत आहे, परिणामी भाजीपाल्याचे दरदेखील वाढले आहेत.
भाजीपाल्याचे दर (प्रति किलो) भाजीपाला
१ जून २१ जून
अ कांदा २० ३०
ब टोमॅटो २५ ३०
क मिरची ३५ ४०
ड कोथिंबीर १० १५
ई पालेभाज्या १० १५
पुन्हा वरणावर जोर
जयश्री खरात - बाजारात दिवसेंदिवस भाजीपाल्याचे दर वाढतच आहेत. या महागाईमुळे चांगल्या भाजीचा बेत रद्द करावा लागत आहे. निदान खाण्याच्या वस्तूंच्या दारावर तरी नियंत्रण आणायलाच हवे.
सुनीता ससाणे - कोरोनामुळे घरातील आर्थिक गणित कोलमडले आहे. रेशनच्या व इतरांनी केलेल्या मदतीच्या आधारावर घरातील अन्न शिजत आहे. त्यामुळे महागाई अशीच वाढत राहिली तर दररोज वरण-भात खावे लागणार आहे.
म्हणून वाढले दर...
अभयराज कुशवाह - इंधनाचे दर वाढल्यामुळे प्रवास खर्च वाढला आहे. परिणामी भाजीपाला महाग झाला आहे. यामुळे आम्हालादेखील नाइलाजास्तव दर वाढवावे लागत आहेत.
जतीन ठाकूर - दुकाने चालू ठेवण्यासाठी घालण्यात आलेले वेळेचे निर्बंध. त्यात येणारे वाढीव वीजबिल यामुळे व्यापारीवर्ग नुकसान सहन करत आहे. भाजीपालादेखील महाग झाल्याने आम्हालाही तो वाढीव दराने विकावा लागत आहे.
शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा
नाना घोडके - अवकाळी पाऊस व गारपीट यांचा सामना करून शेतात पीक घेतले जाते. पीक बाजारात विकल्यानंतर जेमतेम लागवडीचा खर्च निघत आहे. त्यातही मजुरांचे पैसे व प्रवास भाडे देऊन अत्यंत कमी पैसे हातात राहतात.
दिगंबर पाटील - इंधनाचे दर वाढल्याने प्रवास खर्च वाढला आहे. त्यातही शेतात पिकवलेल्या पिकाला बाजारात विक्रीसाठी आणल्यानंतर दलालांच्या हातीच जास्त फायदा लागत आहे. त्यामुळे भाज्या महाग जरी झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या हाती मात्र कमी पैसे लागत आहेत.