Join us

वडापावनंतर काँग्रेसचे आता कांदेपोह्यांचे स्टॉल्स

By admin | Published: July 23, 2015 3:39 AM

मरिन ड्राइव्हवरील खुल्या व्यायामशाळेला विरोध करण्यासाठी स्वाभिमान संघटनेने लावलेली वडापावची गाडी पोलिसांनी मंगळवारी जप्त केल्यानंतर

मुंबई : मरिन ड्राइव्हवरील खुल्या व्यायामशाळेला विरोध करण्यासाठी स्वाभिमान संघटनेने लावलेली वडापावची गाडी पोलिसांनी मंगळवारी जप्त केल्यानंतर काँग्रेसने आज दादरमध्ये कांदेपोह्यांचा स्टॉल टाकला़ लोकांनीही या स्टॉलवर गर्दी करीत कांदेपोह्यांचा मनसोक्त आनंद घेतला़ त्यामुळे असे आणखी स्टॉल्स लावण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या खुल्या व्यायामशाळेवरून गेले काही दिवस राजकीय वाद रंगला आहे़ ही व्यायामशाळा बेकायदा असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत असताना प्रशासनाने यास तात्पुरती परवानगी असल्याचे जाहीर केले़ शिवसेनेच्या दबावाखाली आयुक्त अजय मेहता यांनी या व्यायामशाळेला अभय दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे़ त्यामुळे या व्यायामशाळेविरोधातील आंदोलन काँग्रेसने तीव्र करीत शिवसेनेला आव्हान दिले आहे़त्यानुसार काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने मंगळवारी व्यायामशाळेसमोर वडापावचे स्टॉल्स लावले होते़ पोलिसांनी हे स्टॉल्स रात्री जप्त केल्यानंतर आज पुन्हा या ठिकाणी राणे यांच्या कार्यकर्त्यांनी स्टॉल लावला़ हा स्टॉल दुपारी पोलिसांनी उचलला़ त्याचवेळी काँग्रेसने दादर येथील चित्रा टॉकीजसमोर कांदेपोह्यांचा स्टॉल लावत शिवसेनेला आव्हान दिले आहे़ या स्टॉलवर कारवाई केल्यास शिव वडापावच्या गाड्याही पालिकेला उचलण्यास भाग पाडू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)