दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नाट्यगृहांमध्ये नाटकांची नांदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 07:04 PM2020-12-19T19:04:50+5:302020-12-19T19:05:05+5:30
प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिरात आज पहिला प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून बंद असलेल्या नाट्यगृहांचे द्वार अखेर उघडणार आहे. बोरिवली (पश्चिम) येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदीर संकुलात दहा महिन्यांच्या कालावधीनंतर पहिला नाट्यप्रयोग रविवार दि. २० डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात सादर होणार आहे. त्यामुळे नाट्य रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यापासून लॉक डाऊन जाहीर करण्यात आले. त्या काळापासून बंद ठेवण्यात आलेली नाट्यगृहे आता खुली करण्यात येत आहेत. नाट्यगृहे सवलतीच्या दरात नाट्य प्रयोगांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार बोरिवली येथील पालिकेच्या नाट्यगृहात सायं. ४ वाजता 'इशारो इशारो मैं' या नाटकाचा प्रयोग रविवारी आयोजित करण्यात आला आहे.
तत्पूर्वी या नाट्य संकुलाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले असून सर्व तांत्रिक उपकरणांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाच्या निर्देशांनुसार येथील आसनक्षमता ५० टक्के असणार आहे. नाट्यरसिक, अभ्यागतांचे तापमान मोजण्यासाठी नाट्य संकुलाच्या प्रवेशद्वारांवर थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.