आठवड्यानंतरही भळभळतेय ‘एल्फिन्स्टन’ची जखम, जीवघेणा प्रवास अजूनही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 05:40 AM2017-10-07T05:40:25+5:302017-10-07T14:15:51+5:30
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ निष्पाप जिवांचे बळी गेले. मागील आठवड्यातील शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती.
कुलदीप घायवट
मुंबई : एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ निष्पाप जिवांचे बळी गेले. मागील आठवड्यातील शुक्रवारी सकाळी ही घटना घडली होती. या दुर्घटनेला शुक्रवारी आठवडा उलटला. मात्र, या घटनेची जखम अद्यापही भळभळत असल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे या दुर्घटनेनंतरही रेल्वे प्रशासन ढिम्मच असून, प्रशासनाला जाग केव्हा येणार, असा सवाल मुंबईकरांनी केला आहे.
एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर मुंबईकरांनी रेल्वे प्रशासनावर रोष व्यक्त केला. महापालिकेच्या नावानेही खडे फोडले. मात्र प्रशासन पुलांच्या डागडुजीकडे अद्याप लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. या निषेधार्थ मनसेसह सर्वच राजकीय पक्षांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी आंदोलने केली. मोर्चे काढले. मात्र प्रशासन ढिम्मच आहे.
दरम्यान, आता एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना उर्वरित ठिकाणी घडू नये याकरिता महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या पुलांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सोबतच फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करण्यात येत आहे. मात्र तात्पुरत्या उपाययोजना नकोत, प्रवाशांच्या जिवाशी होणारा खेळ थांबवण्यासाठी ठोस कृती हाती घ्यावी, असे मुंबईकरांचे म्हणणे आहे.
पुलांची रुंदी वाढवा
लोअर परळ येथे कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी रोजगार वाढला आहे. येथे येत असलेल्या कर्मचारीवर्गाचे प्रमाणही वाढले आहे. या कारणास्तव गर्दी वाढल्याने रेल्वे प्रशासनाने गर्दीचे व्यवस्थापन, नवीन पुलांची बांधणी करणे गरजेचे आहे. अरुंद पुलाला रुंद करावे. - प्रीती कदम
उपाययोजना नाहीच
मुंबईकर हे सहनशील झाले आहेत. सर्व अन्याय सहन करून प्रवास करत आहेत. अपघाताच्या घटनेला एक आठवडा पूर्ण झाला तरी रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली दिसून येत नाही. आता रेल्वे स्थानकांवर फक्त जास्त पोलिसांची संख्या दिसून येत आहे.
- चंद्रकांत सावंत
ठोस व्यवस्था हवी
दुर्घटना दुर्दैवी आहे. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने काही तरी ठोस व्यवस्था अमलात आणायला हवी.
- प्रसन्न जोशी
बदल नाहीच
रेल्वे प्रशासनाने काही तरी नवीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. राजकीय पक्ष आंदोलने करत आहेत. त्यामुळे काही तरी बदल होऊ शकतो याची अपेक्षा आहे. एल्फिन्स्टन स्थानक एक आठवड्यापूर्वी जसे होते तसेच आता आहे. त्यात काही बदल करण्यात आला नाही. - राजकुमार जैसवाल
फेरीवाल्यांची समस्या
खूप वर्षांपूर्वी हे पुलांचे बांधकाम केलेले आहे. त्यामुळे पूर्वीची गर्दी आणि आताच्या गर्दीचे अनुमान प्रशासनाने करायला पाहिजे. फेरीवाल्यांची समस्या जाणवत आहे. याबाबत कोणाकडे जाब विचारावा? तिकीट काढून जनावरांसारखा प्रवास करावा लागत आहे.
- समंतलाल भागवत