मुंबई : कोरोनाच्या काळात इंधनासोबतच खाद्यपदार्थांचे भाव वाढल्याने सामान्य माणसाला मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र, आता खाद्यतेलाचे उत्पादन कमी झाल्याने गृहिणींना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यामुळे महिन्याचे कोलमडलेले बजेट सावरण्यास काहीसा आधार मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कडधान्य, डाळी, खाद्यतेल, सिलिंडर, पेट्रोल व डिझेल यांचे भाव गगनाला भिडले आहेत. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच महागाईचा भडका उडाल्याने आता नेमके जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उपस्थित होत आहे. मात्र, आता वर्षभरानंतर खाद्यतेल स्वस्त झाल्याने सामान्य माणसाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
खाद्य तेलाचे दर (प्रति किलो)
आधीचे आत्ताचे सूर्यफूल. १८८. १५७ सोयाबीन. १६२. १३८ शेंगदाणा. १९०. १७४ पाम. १४२. ११५ राई १७५. १५७
शेतकऱ्याच्या घरातही विकतचे तेल
चंद्रकांत साळवे : माझ्या गावी सूर्यफुलाची शेती केली जाते. त्यामुळे याआधी शेतात पिकवलेल्या सूर्यफुलाचे शुध्द तेल घरी यायचे. मात्र, आता महागाई तसेच मागणी नसल्याने हे पीक घेणे बंद केले आहे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाची शेती असूनदेखील मुंबईत तेल विकत घ्यावे लागते.
दिनकर थोरवे : घाण्याचे तेल हेच शरिरासाठी आरोग्यदायक असते. आत्ताचे बाटलीबंद रिफाईंड तेल हे अनेक आजारांना निमंत्रण देते. याआधी ज्यांची शेंगदाणे, सूर्यफूल व सोयाबीन यांची शेती असायची, अशा शेतकऱ्यांकडून घाण्यावर काढलेले तेल घरात वापरण्यासाठी घेत होतो. मात्र, आता तुरळक ठिकाणीच ते मिळत असल्याने नाईलाजाने विकतचे तेल घ्यावे लागते.