‘योग डे’नंतर शहरात योगगुरूंचे भाव वधारले
By admin | Published: June 29, 2015 03:55 AM2015-06-29T03:55:58+5:302015-06-29T03:55:58+5:30
देशात योगाचे महत्त्व वाढत चालले असून नवी मुंबई शहरात देखील योग करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले असून शहरातील योगगुरूंचे महत्त्व वाढत चालले आहे.
वैभव गायकर, पनवेल
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील योगच्या प्रसार व प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेतल्यानंतर देशात योगाचे महत्त्व वाढत चालले असून नवी मुंबई शहरात देखील योग करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले असून शहरातील योगगुरूंचे महत्त्व वाढत चालले आहे.
शहरामधील निवासी संकुल, जिमखाने, अनेक संस्था योगकडे वळल्या असून योगसाठी खास योगगुरूची नेमणूक संस्थेमार्फत करण्यात आली आहे. तसेच योग करण्यासाठी लागणारी लहान चटई (मॅट), विविध प्रकारचे कपडे यांची मागणी वाढली असून अनेक दुकानदारांना त्याचा चांगलाच नफा प्राप्त होत आहे. नवी मुंबई शहरात २१ जून रोजीच्या योग डेच्या दिवशी अनेक ठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, दवाखाने, जेल, शहरातील चौकांवर, समाज हॉलमध्ये, गार्डन्स आदींचा त्यामध्ये समावेश होता. जागतिक स्तरावर योगचे महत्त्व प्राप्त झाल्यानंतर भारतीयांना योगचे महत्त्व समजले असल्याचे काही योगगुरूंचे म्हणणे आहे. यामुळे योगगुरूंचे भाव वधारले असून अनेक योगगुरूंनी आपल्या मानधनात देखील वाढ केली आहे. नवी मुंबई, पनवेल याठिकाणी ५० पेक्षा जास्त योगसंस्था व योगगुरूंचा समावेश आहे. योग दिवसानंतर अनेक योग संस्थांकडे नागरिकांनी आपली नावे नोंदविली आहेत. यामध्ये २१ ते ३५ वयोगटातील नागरिकांचा मोठा सहभाग आहे. अनेक योगगुरू नागरिकांच्या मागणीनुसार घरी, सोसायटीमध्ये जाऊन योग शिकवित आहेत. त्यासाठी महिनाभरासाठी ६००० ते ८००० रुपये एवढी फी आकारली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
योगला मॉडर्न रूप प्राप्त झाले असले तरीसुद्धा प्राचीन संस्कृतीचा भाग असलेल्या योगच्या प्रसारासाठी अनेक योगगुरू मोफत योग शिकवित आहेत. योगचे योगामध्ये रूपांतर झाले असले तरी काही हरकत नाही. अखेर भारतीयांना आपल्याच संस्कृतीचा भाग असलेल्या योगचे महत्त्व कळाले हे महत्त्वाचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.