बाबा सिद्दिकींच्या डायरीत नाव असणाऱ्या मोहित कंबोज यांचा खुलासा; "हत्येच्या दिवशी.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 15:01 IST2025-01-28T15:01:04+5:302025-01-28T15:01:52+5:30
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवला. त्यात त्यांनी बाबा सिद्दिकींच्या डायरीचा उल्लेख करत खळबळजनक खुलासे केले होते.

बाबा सिद्दिकींच्या डायरीत नाव असणाऱ्या मोहित कंबोज यांचा खुलासा; "हत्येच्या दिवशी.."
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकींचा जबाब पोलिसांनी नोंदवला. बाबा सिद्दिकी हे रोज डायरी लिहायचे, त्यात ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख होता. हे प्रकरण समोर येताच आता त्यावर कंबोज यांनी खुलासा केला आहे. सध्या बातम्यांमध्ये गरमागरम चर्चेसाठी विधानांची विपर्यास करून चालवलं जात आहे. या हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये माझे कुठेही नाव नाही असं कंबोज यांनी स्पष्ट सांगितले.
मोहित कंबोज म्हणाले की, झिशान सिद्दिकी यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा जो जबाब नोंदवला, त्यात ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा बाबा सिद्दिकी यांचं माझ्याशी बोलणं झाल्याचं सांगितले. बाबा सिद्दिकी हे माझे १५ वर्ष जुने मित्र आहेत. आम्ही दर आठवड्याला २-४ वेळा बोलायचो. ज्यादिवशी ही घटना झाली ती सर्वांसाठी शॉकिंग होती. संध्याकाळी आमचं बोलणं झाले होते, आम्ही दोघे वांद्रे इथं राहतो. त्यामुळे आमचे चांगले संबंध होते. त्याशिवाय ते एनडीए घटक पक्षातील अजित पवारांच्या पक्षाचे नेते होते. त्यामुळे त्यांच्याशी बऱ्याचदा आमची राजकीय चर्चा होत होती असं त्यांनी सांगितले.
मात्र झिशान सिद्दिकी यांच्या विधानाचा हवाला देत काही माध्यमे याबाबत उलटसुलट चर्चा करत आहेत. मी याचा निषेध करतो. बाबा सिद्दिकी यांची जी हत्या झाली त्याचं सत्य बाहेर यायला हवे. यातील दोषींना कठोर शिक्षा मिळायला हवी. मुंबई पोलिसांना या हत्येमागेचं सत्य काय आहे ते लोकांसमोर लवकरात लवकर आणायला पाहिजे अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली.
झिशान सिद्दिकींनी काय म्हटलं होतं?
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवला. त्यात त्यांनी बाबा सिद्दिकींच्या डायरीचा उल्लेख करत खळबळजनक खुलासे केले होते. दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांना डायरी लिहायची सवय होती. वांद्रे परिसरातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामासाठी ते उभे होते. त्यांचं हे काम करताना काही मोठ्या बिल्डर्संसोबत वाद झाला होता. त्यांनी डायरीत सगळ्या बिल्डर्सची नावे लिहून ठेवली आहेत असे झिशान यांनी पोलिसांना सांगितले होते. ज्यादिवशी बाबा सिद्दिकींची हत्या झाली. त्याच दिवशी त्यांनी डायरीत एक शेवटचे नाव लिहिले होते, ते नाव मोहित कंबोज यांचं आहे. माझ्या वडिलांचे मोहित कंबोज यांच्यासोबत व्हाट्सअपवर संभाषण झाले होते. संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये बोलणं झालं होतं. पण, मोहित कंबोज यांचं नाव का लिहिलं, हे मी सांगू शकत नाही असं झिशाने सांगितले होते.