‘राजगृह’वरील हल्ल्याचे पडसाद; नेत्यांकडून कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 05:48 AM2020-07-09T05:48:59+5:302020-07-09T05:49:25+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानावर अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचे राजकीय वतुर्ळातून तीव्र पडसाद उमटत आहेत.

The aftermath of the attack on the Rajagriha; Demand for action from leaders | ‘राजगृह’वरील हल्ल्याचे पडसाद; नेत्यांकडून कारवाईची मागणी

‘राजगृह’वरील हल्ल्याचे पडसाद; नेत्यांकडून कारवाईची मागणी

Next

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानावर अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचे राजकीय वतुर्ळातून तीव्र पडसाद उमटत आहेत. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल राज्यभर ठिकठिकाणी शांततेत निषेध नोंदविण्यात आला.
राजगृह हे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. दोषींवर कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

तर, राजगृहावर झालेली तोडफोडीची घटना समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. नागरिकांनी समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजगृहाला भेट दिली. डॉ. आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. या प्रक्षोभक घटनेनंतरही आंबेडकर कुटुंबियांनी समाजाला जे शांततेचे आवाहन केले आणि जो संयम दाखवला तो अतिशय कौतुकास्पद आहे, असे आ. मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

भाजप नेते आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार सुनील राणे, आमदार भाई गिरकर यांच्यासह विविध नेत्यांनी राजगृह निवासस्थानी भेट देत पाहणी केली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याची सीआयडीद्वारे चौकशी करावी.
- रामदास आठवले,
समाजकल्याण राज्यमंत्री

आपण शांतता ठेवली पाहिजे. पोलिसांनी ताबडतोब लक्ष घातले. चौकशी सुरू झाली आहे. राजगृहाच्या आजूबाजूला गर्दी करू नये.
- डॉ. प्रकाश आंबेडकर,
वंचित बहुजन आघाडी

‘राजगृह’वर करण्यात आलेला हल्ला अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी आमची मागणी आहे. मी स्वत: भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
- देवेंद्र फडणवीस,
विरोधी पक्षनेते

राजगृह हे लोकशाहीवर, संविधानावर श्रद्धा असणाऱ्यांचे प्रेरणास्थान आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती या वास्तूशी जोडल्या गेलेल्या आहेत. हल्ला करणा-या मनोवृत्तीचा निषेध केला पाहिजे.
- बाळासाहेब थोरात,
महसूल मंत्री

Web Title: The aftermath of the attack on the Rajagriha; Demand for action from leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.