Join us

उन्हाच्या तीव्रतेमुळे निर्णय; ५५ वयाच्या पोलिसांना दुपारच्या फील्ड ड्युटीत सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 8:00 AM

दुपारच्या वेळेत तरुण अधिकाऱ्यांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाहतूक पोलिस शाखेत ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना दुपारी १२ ते ५ या कालावधीत फिल्ड ड्युटी देऊ नये, असे निर्देश सहपोलिस आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत येणाऱ्या उष्णतेची लाट लक्षात घेत, त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते.

शहरातील वाहतूक विभागाच्या प्रभारी सर्व पोलिस निरीक्षकांना जारी करण्यात आलेल्या या निर्देशात ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना दुपारी १२ ते ५ या वेळेत फील्ड ड्युटी देऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे. ज्या अधिकाऱ्यांना रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या जुनाट आजारांनी ग्रासले आहे किंवा मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, त्यांनाही मार्गदर्शक तत्त्वांनुसार फील्ड ड्युटीवर तैनात केले जाणार नाही. या निर्देशात पुढे म्हटले आहे की, ड्युटीवर तैनात कर्मचाऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी सहज उपलब्ध असावे. रस्ता आणि वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांसह एक वॉर्डन मदतीसाठी नियुक्त करावा. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना वर्षभर रस्त्यावर उभे राहावे लागते. उन्हाळ्यात कडक उन्हात उभे राहणेही त्यांच्या कर्तव्यात सामील आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची तब्येत उत्तम राहावी आणि चढत्या पाऱ्यामुळे विभागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

दुपारच्या वेळेत तरुण अधिकाऱ्यांची नियुक्ती दुपारच्या वेळेत कर्तव्यासाठी तरुण आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. त्यांना जोड्यांमध्ये नियुक्त केले जावे आणि जेथे आवश्यक असेल तेथे मदतीसाठी त्यांच्यासोबत एक ट्रॅफिक वॉर्डनदेखील नियुक्त केला जाईल, असे पडवळ यांनी म्हटले आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पुढे नमूद केले आहे की, अचानक छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा इतर आरोग्य समस्या असल्यास कर्तव्यावर असलेल्या संबंधित अधिकाऱ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे.

 

टॅग्स :पोलिससमर स्पेशल