मुंबई: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित भेटीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून उपरोधिकपणे निशाणा साधला आहे. अफजल खान उंदीर यांची गळाभेट उद्या होणार तर!, असे ट्विट करत सावंत यांनी या भेटीची खिल्ली उडविली.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांना अफजल खानाची उपमा दिली होती. हा अफजल खान महाराष्ट्रावर चाल करून येत असल्याचे सांगत उद्धव यांनी निवडणुकीच्या काळात भावनिक वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. ही टीका भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये तुंबळ वाकयुद्ध रंगले होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका करण्यात आली होती. तेव्हापासून शिवसेना आणि भाजपामधील संबंध सातत्याने तणावपूर्ण राहिले आहेत. केंद्रात सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शिवसेनेला फारसे महत्त्व दिेले नव्हते. यापूर्वीच्या शिरस्त्यानुसार भाजपाचे केंद्रीय नेतृत्त्व मुंबईत आल्यास त्यांची मातोश्री भेट हमखास ठरलेली असायची. मात्र, मोदी आणि शहा यांनी ही प्रथा मोडीत काढून शिवसेना नेतृत्त्वाला फारशी किंमत देत नसल्याचा संदेश दिला होता. मात्र, आता बदलत्या परिस्थितीत भाजपाला शिवसेनेशी जुळवून घेणे भाग पडणार आहे. देशभरात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मोठा फटका बसला होता. भाजपाच्या मतांची टक्केवारी लक्षणीयरित्या घटली होती. याशिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजपाविरुद्ध मोट बांधायला सुरूवात केली आहे. नुकत्याच झालेल्या कैराना लोकसभा मतदारसंघात त्याचा प्रत्यय आला. 2019 मध्ये विरोधक अशाप्रकारेच एकत्र आल्यास भाजपासाठी निवडणूक अवघड होईल. अशा परिस्थितीत भाजपाला शिवसेनेसारख्या जुन्या मित्रपक्षाची गरज लागणार आहे.
अफझल खान आणि उंदीर यांची गळाभेट होणार; ठाकरे-शहा भेटीवर काँग्रेसचा निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 11:33 AM