पुन्हा ‘बदला’पूरची भीती
By admin | Published: August 16, 2016 04:58 AM2016-08-16T04:58:29+5:302016-08-16T04:58:29+5:30
बदलापूरला रेल्वे प्रवाशांनी आंदोलन करून तब्बल सहा तास वाहतूक रोखून धरली. त्यातील मूळ प्रश्न समजून घेण्याऐवजी रेल्वेने प्रवाशांना समाजकंटक ठरवले.
डोंबिवली : बदलापूरला रेल्वे प्रवाशांनी आंदोलन करून तब्बल सहा तास वाहतूक रोखून धरली. त्यातील मूळ प्रश्न समजून घेण्याऐवजी रेल्वेने प्रवाशांना समाजकंटक ठरवले. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. मग खासदार नेमके काय करत आहेत? जोवर लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी तातडीने हालचाली केल्या जात नाहीत तोवर हा प्रश्न सुटणार नाही. गुन्हे दाखल झाले तर असंतोष पुन्हा व्यक्त होईल, असा इशारा रेल्वे प्रवासी संघटनांनी दिला आहे.
लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, कसारा येथून ठाणे-कुर्ला स्थानकापर्यंत फेऱ्या वाढायला हव्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
जलद गाड्यांची संख्या वाढायला हवी आणि ठाणे ते बदलापूर, टिटवाळा पट्ट्यात रेल्वेला समांतर मार्ग व्हायला हवा, या मागण्या पुन्हा समोर आल्या. लांब अंतराच्या गाड्यांचे थांबे कमी करून प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली.
(प्रतिनिधी)
वांगणीचे स्टॅबलिंग यार्ड तयार झाले. तेथून लोकल बदलापूरमध्ये आणल्या जातात. पण त्या येण्यापूर्वीच भरलेल्या असतात. त्यामुळे त्या वांगणीतूनच सीएसटीसाठी सोडाव्या. कळवा स्थानकातही असेच चित्र आहे. लोकल भरल्यानंतर ठाणे स्थानकात जाते. लोकल जेथून सुटते तेथूनच प्रवासाची सुविधा द्या.
- मनोहर शेलार, अध्यक्ष, वांगणी रेल्वे प्रवासी संस्था
महिला प्रवाशांच्या समस्यांना कोणी वाली नाही. बैठकांमध्ये केवळ आश्वासने दिली जातात. बदलापूर मार्गावर सकाळच्या वेळेत महिला विशेष लोकल हवी, या मागणीला केराची टोपली दाखवली गेली. महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकीची योजना बासनात गुंडाळली गेली. स्वच्छतागृहांचा प्रश्न जैसे थे आहे. मग गेल्या दहा वर्षात महिला प्रवाशांसाठी काय केले?
- लता अरगडे, डोंबिवली
डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, वांगणीपर्यंत वाढलेल्या शहरीकरणात प्रवासाचा वेळ कमी झाला नाही. त्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. त्यांना सुविधा मिळायला हव्यात.
- अॅड. दत्तात्रय गोडबोले, बदलापूर
लाखो रेल्वे प्रवाशांचे प्रश्न गंभीर होत असून त्यावर ठाणे जिल्ह्यातील खासदारांनी एकत्र विचार करायला हवा. तसे होतांना दिसत नाही. मरणारे रोजच मरत आहेत. भविष्यात हे चित्र गंभीर होणार.
- अॅड. सुप्रिया भगत
बदलापूर स्थानकात पश्चिमेला होम प्लॅटफॉर्म हवा. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार नाहीत. बदलापूर लोकलमध्ये अंबरनाथहून प्रवासी बसून येतात. अशा लोकलला अर्थ काय? कल्याण, डोंबिवली लोकलचे तेच.
- संजय मेस्त्री, बदलापूर प्रवासी संघटना
अंबरनाथ-बदलापूरपर्यंत १५ डब्यांच्या गाड्यांचा प्रस्ताव कागदावरच राहिला. आसनगाव-बदलापूर मार्गावर जलद लोकल, तेथे तिसरा मार्ग, सीसी कॅमेऱ्यांचा प्रस्ताव यावर काहीही झाले नाही. - अनिता झोपे, अध्यक्षा, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन
कसारा-कर्जतमार्गे येणाऱ्या लांबपल्याच्या गाड्यांमध्ये गर्दीच्या वेळेत प्रवाशांना संधी द्यावी. त्या गाड्या आसनगाव, टिटवाळा, वांगणी बदलापूर, अंबरनाथ किंवा उल्हासनगरला थांबवाव्या.
- जितेंद्र विशे, आसनगाव
रेल्वे अधिकारी नेहमी माहिती का लपवतात? डीआरएमसारख्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने समस्या सुटणार नाहीत. नवे अधिकारी तोच घोळ घालतात. - विश्वनाथ धात्रक, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन
कमी अंतराच्या फेऱ्या कमी करायच्या आणि त्या लांभ अंतरासाठी वाढवायच्या, असा घाट प्रशासनाकडुन घातला जातो. त्यामुळे वेळापत्रकात गाड्या वाढल्याचे दिसून येते, पण गर्दीवर नियंत्रण येत नाही.
- नितीन परमार, कर्जत
प्रवासी संघटनाही अनेकदा सुस्त असतात. बऱ्याचदा टीका करण्यात वेळ दवडतात. चलो दिल्लीचा नारा देतात. प्रत्यक्षात तेथे गेल्यावर तेथील रेल्वे अधिकाऱ्यांच्या चहाच्या पेल्यातील गप्पांमध्ये मुळ मुद्दा विसरतात. केवळ दौरे करुन निघून येतात. त्यातून काही मिळत नाही.
- करूणा जोशी.
दिवा स्थानकात फास्ट लोकल कधी थांबणार? कूर्म गतीने कामे सुरु आहेत. गतवर्षी दिव्यात, आता बदलापूर मार्गावर अशा घटना घडत आहेत, म्हणजेच प्रवाशांमध्ये असंतोषाची भावना आहे. रेल्वेने याची वेळीच नोंद घ्यावी.
- अॅड. आदेश भगत, अध्यक्ष दिवा रेल्वे प्रवासी संघटना
मुंब्रा-कळवा प्रवाशांना कोणीही वाली नाही. दिवावासीयांनी राग दाखवला, पण येथील प्रवाशांना आणखी किती सोसावे लागणार. सकाळी गर्दीच्या वेळेत अवघे दोन-चार प्रवासी प्रवेश करतात. काही जीव धोक्यात घालत विरुद्ध दिशेने लोकलमध्ये चढतात.
- नाझिमा सय्यद, मुंब्रा
लोकल प्रवासातील विद्यार्थ्यांचे प्रश्न वाढतच आहेत. ज्येष्ठांचे प्रश्न जैसे थे आहेत. दिवसेंदिवस प्रवास जीवघेणा होत आहे. राज्य शासनाने समांतर रस्त्यासारखे प्रश्न मार्गी लावावेत. जलवाहतूक पर्यायांना गती द्यावी. याची केवळ चर्चा होते. हालचाल मात्र शून्य.
- जगदीश धनगर, शिक्षक