शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 08:12 PM2023-10-03T20:12:06+5:302023-10-03T20:12:17+5:30
राज्यातील शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २०२२ ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडून स्व-प्रमाणपत्र नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, नोंदणीनंतर टीईटीची माहिती न जुळणे किंवा अन्य कारणास्तव स्वप्रमाणपत्र पूर्ण न करता आलेल्या उमेदवारांना शिक्षणाधिकार्यांकडून प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी येत्या ६ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षक भरतीचा पुढील टप्पा लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २०२२ ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. राज्यात काही ठिकाणी इंटरनेट सुविधा व्यवस्थित नसल्याने काही उमेदवारांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण न करता आल्याने २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार टीईटी परीक्षेत गैरप्रकरणातील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
आता ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या उमेदवारांनाच शिक्षणाधिकार्यांकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील लाखो उमेदवार शिक्षक भरतीच्या जाहिरातीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने शिक्षक भरतीच्या प्रक्रियेचा पुढील टप्पा लवकर सुरू करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.