लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील वर्षी झालेल्या कोरोनाच्या प्रकोपानंतर मागील काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली होती. यामुळे प्रशासनाने नियम व अटी शिथिल केल्या होत्या. यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले होते. परंतु फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने राज्यासमोर लॉकडाऊनचे संकट उभे ठाकले आहे. मध्यंतरी नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी झाल्याने काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी नियम पाळत नव्हते. यामुळे विनामास्क फिरणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न राखणे अशा गोष्टींचे प्रमाण वाढले होते. मात्र हीच चूक नागरिकांच्या पुन्हा एकदा अंगलट आलेली आहे.
कोरोनामुळे उद्योग क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे अनेकांना नोकऱ्यादेखील गमवाव्या लागल्या. मागील काही महिन्यांपासून उद्योगधंदे सावरत असल्याने काही अर्थचक्र पूर्वपदावर येऊ लागले होते. मात्र आता सर्व उद्योजकांना लॉकडाऊनची चिंता लागल्याने यापुढे आता काय होणार, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. कोरोना व लॉकडाऊनचे संकट टाळायचे असल्यास आपल्यासमोर केवळ मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क व सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनची नामुष्की ओढावू शकते. यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे.
धोका वाढतोय
मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. मागील महिन्यात कोरोना नियंत्रणात असताना मुंबईत दररोज ३०० ते ४०० कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. मात्र आता ८०० ते ९०० कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यात बस, रेल्वे तसेच बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण : ७१५०४९
बरे झालेले रुग्ण : ३०१५९३
कोरोना बळी : १९७५७
उद्योग संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात...
उद्योगधंदे कोरोनाच्या संकटातून आता कुठे सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात मार्च एंडिंग असल्यामुळे आर्थिक ताळमेळ बसवायचा आहे. मागील वर्षभरात अनेक कंपन्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. त्यात काही दिवसांवर अधिवेशन असल्याने राज्यासाठीदेखील लॉकडाऊन परवडणारे नाही. कोरोनाबाधित रुग्ण केवळ महाराष्ट्रातच का वाढत आहेत हादेखील प्रश्न आहे. सरकारी नोकरदार वगळता अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. तर काही जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास व्यापाऱ्यांवर तसेच इतर नोकरदारांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल.
- अनिल फोंडेकर (अध्यक्ष, मुंबई व्यापारी असोसिएशन)
----
कोरोनानंतर उद्योग हळूहळू रुळावर यायला लागला होता. परंतु पुन्हा एकदा कोरोनाचे संकट उद्भवू लागल्याने मोठी चिंता वाटत आहे. मधल्या काळात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने प्रशासनाने काही नियम व अटी शिथिल केल्या होत्या. यामुळे अनेक जण बेफिकिरीने वागत होते. लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा उद्योग-धंदे बंद पडतील व हे महाराष्ट्राला अजिबात परवडणारे नाही. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळायलाच हवेत. आपल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे ब्रेक लागल्यास परिस्थिती अतिशय गंभीर होऊ शकते.
- मिलिंद कांबळे (संस्थापक अध्यक्ष, डीआयसीसीआय)