मुंबई - विक्रोळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांवर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केले आहे. काल विक्रोळीत मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही पण गरीबांच्या पोटावर जेव्हा मनसेचे गुंड लाथ मारणार तेव्हा प्रतिक्रिया ही उमटणारच. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी असे संजय निरुपम यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
रविवारी मनसेचे विक्रोळीतले उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम, विनोद शिंदे आणि उपशाखा अध्यक्ष उपेंद्र शेवाळे एका दुकानावर मराठी पाटी लावावी या मागणीसंदर्भात दुकानदाराला भेटण्यासाठी गेले होते. दुकानदार आणि ढोलम यांची चर्चा सुरू असताना परिसरातले फेरीवाले तिथं गोळा झाले, त्यांनी ढोलम आणि यांच्य सहका-यांवर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली.
उपेंद्र शेवाळेंच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शेवाळेंच्या कवटीला फ्रॅक्चर झालं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत ढोलम यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. विश्वजीत ढोलम यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे जाब विचारायला गेले होते. तेव्हा फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना अजून मारहाण केली. या मारहाणीत शिंदे आणि उपेंद्र शेवाळे हे जखमी झाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेचे मालाडमधले नेते सुशांत माळवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. मागच्या महिन्यात फेरीवाल्यांनी मालाड पश्चिम मनसे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांना मारहाण केली होती.
त्यावेळीही संजय निरुपम यांनी केले होते समर्थनमालाडमध्ये माळवदे यांच्यावर हल्ला होण्याच्या काहीवेळआधी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा मालाडमध्ये पार पडली होती. त्यांनी फेरीवाल्यांशी संवाद साधला होता. संजय निरुपम यांनी मनसेचे कार्यकर्ते हफ्ता मागत होते, त्यांच्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केला असं सांगत समर्थन केलं. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केला होता.