मुंबई : रंगभूमी आपली आहे. त्यामुळे पॅनलही आपलेच हवे, आपल्या माणसांचे असे म्हणत निर्माते नवनाथ (प्रसाद) कांबळी यांच्या आपलं पॅनलने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराचा शंखनाद केला आहे. आरोपांचा समर्थपणे सामना करून ते खोडून काढल्यानंतर आपलं पॅनल पुन्हा नव्या जोमाने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद कांबळी, सुकन्या कुलकर्णी-मोने, मंगेश कदम, राजन भिसे, प्रमोद पवार, संतोष काणेकर, रत्नकांत जगताप, सुनील देवळेकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, प्रभाकर वारसे, दिगंबर प्रभू, अनिल कदम आदी मंडळी सहभागी झाली होती. प्रसाद कांबळी यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या उपयुक्त कामांची माहिती दिली.
विरोधकांकडून कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जात असून, निवडणूक लढवणार नसल्याचे ठरवल्यानंतरही कोणत्या कारणांसाठी शेवटच्या क्षणी पुन्हा अर्ज भरला याबाबतही खुलासा केला. आगामी पाच वर्षांच्या काळामध्ये आपलं पॅनल रंगकर्मींच्या हितासाठी कंबर कसून काम करण्यासाठी सज्ज झाल्याचेही त्यांनी सांगितले.मागील पाच वर्षांमध्ये रंगभूमीच्या विकासासाठी अनेक कामे केल्यानंतर असलेला स्वच्छ आणि निर्भेळ कारभार काहींना न पाहावल्याने वैयक्तिक आकसापोटी त्यांनी जाणीवपूर्वक काही लोकांना हाताशी धरून दिशाभूल केल्याचेही प्रसाद म्हणाले.
चर्चा करूनच निर्णय...
तब्बल १० वर्षांनी निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी पॅनलमधील सर्वांशी चर्चा केल्यानंतर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे प्रमोद पवार म्हणाले. रत्नकांत जगताप यांनी पडद्यामागच्या रंगकर्मींचे प्रश्न आपलं पॅनलच्या माध्यमातून सोडवण्यात आले असून, यापुढेही अशा प्रकारचे भरीव काम करण्यात येईल, याची खात्री दिली. आपलं पॅनलमधून २०२३ ते २०२८ या वर्षांसाठी लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, रंगमंच कामगार, व्यवस्थापक, कलाकार, निर्माते या सर्वांना प्रतिनिधित्व देण्यात आले असून ते एकत्रितपणे पुन्हा उभे ठाकले आहेत. निवडणूक १६ एप्रिलला होणार आहे.