Join us  

दफनभूमीवरील अतिक्रमणाविरोधात आदिवासींच्या जिल्हाधिकार्‍यांकडे फेर्‍या

By admin | Published: May 24, 2014 7:45 PM

कल्याण तालुक्यातील वाघेरापाडा येथील दफनभूमीवर उभ्या राहिलेल्या कंपनीचे अतिक्रमण तत्काळ तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे या परिसरातील आदिवासींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणे : कल्याण तालुक्यातील वाघेरापाडा येथील दफनभूमीवर उभ्या राहिलेल्या कंपनीचे अतिक्रमण तत्काळ तोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे या परिसरातील आदिवासींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या या जागेवर बिसलरी बॉटलचे पॅकिंग, केबलची निर्मिती, रंगाची फॅक्टरी आदी उद्योग संबंधित कंपनीने सुरू केले आहेत. मंत्रालयातील लोकशाही दिनात यासंदर्भात बाळाराम काशिनाथ शीद यांनी तक्रार केली असता मुख्यमंत्र्यानी तत्काळ कारवाई करून दफनभूमी मोकळी करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले. पण केवळ कंपनीला सुमारे एक वर्षापूर्वी सील करण्याची कारवाई करण्यात आली. परंतु कंपनी मात्र अद्याप तोडण्यात न आल्याने आदिवासींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मुख्यमंत्र्यांच्या आदेशास अनुसरून या कंपनीला तत्काळ हटवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी लेखी निवेदन देऊन स्मरण करून दिले जात आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या बेकायदेशीर कंपनीने अतिक्रमण करून जमीन हडप केली आहे. यामुळे संबंधित आदिवासींना दफनविधी करण्यास समस्या उद्भवत असून अन्य जागेचा वापर त्यांना करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिकार्‍यांनी वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासींकडून दिला जात आहे. (प्रतिनिधी)