Join us

पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची शिवसेनेवर नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 7:32 PM

Mumbai municipal administration : महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या नगरसेवकांसह पालिका मुख्यालयात बुधवारी आंदोलन केले.

 

मुंबई - लॉक डाऊनच्या काळातील पालिका प्रशासनाच्या एकतर्फी कारभारावर भाजप व विरोधी पक्षाने व्यक्त केली होती. मात्र सत्ताधारी प्रशासनाविरोधात सत्ताधारी शिवसेनेला ठिय्या आंदोलन करावे लागले आहे. वरळी येथील जी/दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रशासनाच्यावतीने उपायुक्त, सहायक आयुक्त उपस्थित न राहिल्यान महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या नगरसेवकांसह पालिका मुख्यालयात बुधवारी आंदोलन केले. अखेर आयुक्तांनी दूरध्वनीवरून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या वादावर पडदा पडला. 

प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. १७ पैकी चार प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या. यामध्ये वरळी, प्रभादेवी, लोअर परळचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचाही समावेश आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे वरळी विधानसभेत निवडून आले आहेत. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याच विभागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सकाळी दहा वाजता याच जी/ दक्षिण प्रभाग समितीची निवडणूक पार पडली. 

या प्रभागात एकमेव शिवसेनेचा अर्ज प्राप्त झाल्याने नगरसेवक दत्ता नरवणकर यांची बिनविरोध निवड झाली. मात्र निवडणुकीची औपचारिकता पार पाडण्यासाठी या प्रक्रियेला सुरुवात झाली, तरी प्रशासनाच्यावतीने उपायुक्त व सहाय्यक आयुक्त उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांसह महापौरांनी याचा तीव्र निषेध नोंदवत मुख्यालयातील महापौर कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल मंत्रालयात परत जा, अशी मागणीही शिवसेना नेत्यांनी यावेळी केली. अखेर आयुक्तांनी फोन करून महापौरांकडे दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई