पुन्हा आॅनलाइन अॅसेसमेंटची अग्निपरीक्षा!विद्यापीठाचा मास्टर प्लॅनचा दावा, विद्यार्थ्यांत धाकधूक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 06:55 AM2017-11-03T06:55:13+5:302017-11-03T06:57:25+5:30
मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्रातील ४८१ परीक्षांच्या मूल्यांकनासाठी पुन्हा एकदा आॅनलाइन अॅसेसमेंट पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली असली, तरी विद्यापीठाने मात्र यंदा सदोष आणि जलद निकालाचा मास्टर प्लॅन तयार केल्याचा दावा केला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्रातील ४८१ परीक्षांच्या मूल्यांकनासाठी पुन्हा एकदा आॅनलाइन अॅसेसमेंट पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली असली, तरी विद्यापीठाने मात्र यंदा सदोष आणि जलद निकालाचा मास्टर प्लॅन तयार केल्याचा दावा केला आहे.
याआधी राबवण्यात आलेल्या आॅनलाइन अॅसेसमेंट पद्धतीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान झाले होते. शिवाय विद्यापीठाला डॉ. संजय देशमुख यांच्या हकालपट्टीची नामुष्की सहन करावी लागली होती. मात्र कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विद्यापीठाने मास्टर प्लॅन तयार केल्याचे सांगत यंदा जलद आणि सदोष निकाल लावण्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, दुसºया सत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेसाठी २२७ परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी १ लाख ३६ हजार ८७९ एवढे विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. तर वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील ७८ परीक्षा होणार असून त्यात १ लाख ७३ हजार ६७० विद्यार्थी प्रवेशित होणार आहेत. मानव्य शाखेसाठी ६४ परीक्षा होणार असून यासाठी ९४ हजार १८८ एवढे विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. तर आंतरविद्याशाखेच्या ११२ परीक्षांसाठी ५ हजार ७१२ विद्यार्थी प्रवेशित होतील. अशा प्रकारे एकूण ४८१ परीक्षांसाठी ४ लाख १० हजार ४४९ विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
विद्यापीठ काय करणार?
- प्रथम सत्रामध्ये उद्भवलेल्या योजना आणि त्याचे नियोजन, अंतर्गत सामंजस्य यावर मात करून या पद्धतीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- प्रथम सत्रामध्ये मूल्यांकनासाठी वापरण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. ज्यामध्ये स्कॅनिंग, पुरवणीचे टॅगिंग, विविध बास्केटमध्ये उत्तरपुस्तिका या सर्व बाबींवर मात करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- कॅप सेंटरवर उद्भवलेल्या प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणीवर मात करून सुमारे २८२ कॅप सेंटर सज्ज करण्यात आली आहेत.
- उत्तरपुस्तिकांच्या मूल्यांकनासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत.
अशी करणार वेळेची बचत
प्रथम सत्राच्या परीक्षांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवरून परीक्षा झाल्यानंतर ६ ते १२ दिवसांनंतर उत्तरपुस्तिका परीक्षा विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावर मात करून विद्यापीठाने मास्टर प्लॅनमध्ये परीक्षा झाल्यानंतर लगेच ३ दिवसांत उत्तरपुस्तिका परीक्षा विभागाकडे जमा करण्यात येणार असून पाचव्या दिवशी स्कॅनिंगला सुरुवात केली.