Join us  

मच्छीमारांच्या न्याय हक्कासाठी आगरी-कोळी संघटना पालिका मुख्यालयावर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:09 AM

मुंबई : मुंबईतील मासळी बाजारांचे मुंबईबाहेर स्थलांतर न करता त्यांचे मुंबईतच पुनर्वसन करा, या मागणीसाठी आज अखिल महाराष्ट्र मच्छीमार ...

मुंबई : मुंबईतील मासळी बाजारांचे मुंबईबाहेर स्थलांतर न करता त्यांचे मुंबईतच पुनर्वसन करा, या मागणीसाठी आज अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वात आगरी-कोळी संघटना मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडकणार आहेत. या आक्रोश मोर्चात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील सर्व कोळीवाडे तसेच अनेक आगरी कोळी संघटना सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी मंगळवारीच तयारीला वेग आला होता. विविध कोळीवाड्यांमध्ये बैठका घेऊन या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आंदोलन समितीदेखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईवर आणि आता दादरमधील मीनाताई ठाकरे मासळी मंडईवर मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. यामुळे मासळी विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जोपर्यंत समुद्र आहे, तोपर्यंत मुंबईतील भूमिपुत्र असणारे आगरी-कोळी बांधव मुंबईत राहणारच, अशी हाक देत सर्व भूमिपुत्र या मोर्चात सहभागी होणार आहेत.

अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दिलेल्या हाकेला विविध आगरी-कोळी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. सरकारचा आमच्यावरील अन्याय बस झाला, आता आपण रस्त्यावर उतरायचेच, असा निर्धार येथील भूमिपुत्रांचा आहे. सरकारने आमचे ऐकले नाही तर यापुढे मोर्चाचे स्वरूप अधिक व्यापक असणार आहे.

- देवेंद्र तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती