Join us

वय ८३ झालं, तुम्ही थांबणार की नाही?; अजित पवार यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 6:12 AM

फुटीनंतर अजित पवार यांच्या गटाची बैठक वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या पटांगणात पार पडली. यावेळी ते बोलत होते.

मुंबई : तुमचे वय ८३ वर्षे झाले तरी तुम्ही थांबणार आहात की नाही? हे सर्व कशासाठी चालले आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे का घेतला? असे प्रश्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी केले. 

फुटीनंतर अजित पवार यांच्या गटाची बैठक वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या पटांगणात पार पडली. यावेळी ते बोलत होते. एमईटीच्या भव्य पटांगणात पार पडलेल्या या बैठकीला आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘अजित पवार संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी सुरू झालेल्या या सभेत तरुणवर्ग, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अजित पवार यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवरील प्रतिज्ञापत्रे कार्यकर्त्यांकडून भरून घेण्यात आली. 

तेव्हा मुख्यमंत्रिपद घेतले असते तर....आमदारांची ससेहोलपट होत आहे, तेव्हा वरिष्ठांनी आराम करावा, आज थोडेच बोललो आहे; पण पुढे सभा झाल्या तर मला आणखी बोलावे लागेल.  २००४ साली महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सर्वाधिक ७१ आमदार निवडून आले होते. तेव्हा मुख्यमंत्रिपद घेतले असते तर आजपर्यंत राज्यात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असता. मी चार ते पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो; पण गाडी काही पुढे सरकत नाही. मलाही मनापासून वाटते की राज्याचा प्रमुख व्हावं. नोकरीला लागला की, माणूस ५८ व्या वर्षी रिटायर्ड होतो, आयएएस, आयपीएस ६० व्या वर्षी रिटायर्ड होतात. राजकारणामध्ये भाजपात ७५ व्या वर्षी रिटायर्ड केले जाते. मग तुम्ही थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना. चुकले तर सांगा की, अजित तुझे हे चुकले. चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ, राजकारणात नवीन पिढी पुढे येईल.    - अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार