हृदयविकाराचे वय उतरतेय! वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 07:25 AM2018-09-27T07:25:46+5:302018-09-27T07:26:06+5:30
बऱ्याचदा हृदयाविषयी आजार म्हटल्यावर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचे डोळ्यासमोर येते. मात्र, याशिवाय हृदयविकारांशी संबंधित अनेक आजारांचे वय आता उतरले असल्याचे गंभीर निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले.
मुंबई - बऱ्याचदा हृदयाविषयी आजार म्हटल्यावर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचे डोळ्यासमोर येते. मात्र, याशिवाय हृदयविकारांशी संबंधित अनेक आजारांचे वय आता उतरले असल्याचे गंभीर निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. तरुण वयातील हृदयविकाराकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत, हार्ट फेल्युअरची समस्या भविष्यात हृदयविकारांशी संबंधित मोठ्या आजारांचे स्वरूप घेते, असेही डॉक्टरांनी सांगितले. २९ सप्टेंबर रोजी असणाºया ‘जागतिक हृदय दिना’च्या पार्श्वभूमीवर हृदयविकाराच्या लक्षणांकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन वैद्यकीयतज्ज्ञांनी केले आहे.
हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हा विकार होतो. भारतीय रुग्णांमधील हार्ट फेल्युअरचे प्रमुख कारण ‘इस्केमिक हृदयविकार’ हे आहे.
लवकर निदान होईल व उपचार मिळतील, याकडे लक्ष द्यावे. कारण यामुळे हृदयविकारामुळे होणाºया मृत्यूंची संख्या कमी करता येईल. पंजाब, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि त्या खालोखाल हिमाचल प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये इस्केमिक हृदयविकाराचे प्रमाण सर्वाधिक आहे.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देव पहलाजानी म्हणाले की, हृदयरोग मृत्यूबाबत धोक्याची घंटा वाजवत असतो. हृदयाकडून होणारे रक्तवहन करणारे स्नायू कमकुवत झाल्याने किंवा ते कडक झाल्याने हा आजार जडतो. महिन्याला उपचार घेण्यासाठी येणाºया रुग्णांपैकी १५ टक्के प्रमाण या रुग्णांचे असते. इस्केमिक हृदय आजारासह अतितीव्र स्वरूपाचा मधुमेह आणि ताणतणाव, यामुळेही हृदयरोगाचे रुग्ण वाढत चालले आहेत. श्वास घेताना दम लागणे, थकवा येणे, कोपरदुखी, पाय किंवा ओटीपोटात दुखणे, अचानक वजन वाढणे, रात्रीच्या वेळी लघवीला जास्त होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर अशांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी लक्षणे केवळ उतारवयातच दिसून येतात असे नाही, तसेच ती इतर कुठल्याही आजारांत दिसत नाहीत. अशी लक्षणे दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लक्षणांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज
देशातील हार्ट फेल्युअरचे प्रमाण आणि त्यामुळे होणाºया मृत्यूंचा दर वाढत असल्याने, या विकाराकडे सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. बरेचदा रुग्ण जेव्हा पुढे गेलेली लक्षणे घेऊन रुग्णालयात दाखल होतात किंवा त्यांना हार्ट फेल्युअरशी संबंधित असा दुसरा एखादा हृदयविकार होतो, तेव्हा या विकाराचे निदान होते. त्यामुळे हार्ट फेल्युअरच्या लक्षणांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने यंत्रणा उभारली पाहिजे.
- डॉ. के. सरत चंद्र, अध्यक्ष,
कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया
जगातील एकूण इस्केमिक हृदयविकाराच्या रुग्णांपैकी सुमारे एक चतुर्थांश देशात आहेत.
देशात ८-१० दशलक्ष हार्ट फेल्युअरचे रुग्ण आहेत.
हार्ट फेल्युअरच्या रुग्णांपैकी २३ टक्के निदान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत दगावतात.
भारतीय रुग्णांमधील हार्ट फेल्युअरमागील प्रमुख कारण इस्केमिक हृदयविकार.