वयाच्या ऐन नव्वदीत ‘संगीत संन्यस्त खड्ग’...!, मर्मबंधातली ठेव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 03:29 AM2020-09-19T03:29:18+5:302020-09-19T03:29:40+5:30
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेले हेच नाटक आता वयाच्या ऐन नव्वदीत येऊन पोहोचले आहे.
- राज चिंचणकर
मुंबई : तब्बल पावणेदोनशे वर्षांची परंपरा जपणाऱ्या मराठी रंगभूमीवर, एकाहून एक सरस अशा संगीत नाटकांनी ताल धरला आणि या नाट्यकृती मायबाप रसिकांच्या थेट मनात घर करून बसल्या.
याच मांदियाळीत 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाचे नाव घ्यावे लागेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेले हेच नाटक आता वयाच्या ऐन नव्वदीत येऊन पोहोचले आहे. 'संगीत संन्यस्त खड्ग' नाटकाचा पहिला प्रयोग बळवंत संगीत मंडळींनी मुंबईच्या एल्फिन्स्टन नाट्यमंदिरात १८ सप्टेंबर १९३१ रोजी सादर केला होता. या घटनेला आता नऊ दशके होत आहेत.
काही नाट्यकृती चिरंतन असतात आणि मर्मबंधातली ठेव म्हणून त्या तितक्याच मायेने जपल्याही जातात. ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकात तर थेट मर्मबंधातल्या प्रेममय ठेवीच्या पदानेच रुंजी घातली आहे. गेली नऊ दशके हे नाटक रसिकांच्या हृदयात हिंदोळे घेत आहे. वैचारिक लेखणीचा उच्चत्तम आविष्कार असलेले हे नाटक अलीकडच्या काळात मुंबई मराठी साहित्य संघाने पुन्हा रंगभूमीवर आणले. सध्याच्या लॉकडाऊनमुळे मात्र त्याचे प्रयोग बंद आहेत.
केवळ संगीत नाटक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या नाट्याकडे पाहता येणार नाही; कारण यात जो विचार मांडला आहे, तो थेट राष्ट्रकर्तव्याशी नाते सांगणारा आहे. विशेष म्हणजे, हा विचार इतक्या वर्षांनंतरही आजचा वाटतो. शाक्यांचे सरसेनापती विक्रमसिंह आणि गौतम बुद्ध, अर्थात सिद्धार्थ यांच्यातल्या विलक्षण संवादरूपी प्रवेशावर रंगणाºया या नाट्यात शांती, अहिंसा यावर थेट दृष्टिक्षेप टाकला गेला आहे. अहिंसा आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित वादविवाद हे या नाट्यकृतीचे वैशिष्ट्य आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे श्रवणीय संगीत हे या नाटकाचे महत्त्वाचे अंग आहे. विक्रमसिंह, सिद्धार्थ, वल्लभ, सुलोचना आदी पात्रांच्या माध्यमातून; तसेच गद्य व पद्याच्या साधलेल्या अचूक मिलाफातून ही नाट्यकृती अजरामर झाली आहे.
नाट्यपदांची
मोहिनी कायम
या नाटकातल्या 'मर्मबंधातली ठेव ही', 'शतजन्म शोधिताना', 'नसे जीत पहा सेनानी', 'प्रिया घे निजांकी जाता', 'रती रंग रंगे ध्यान', 'समयी सखा न ये', 'सुकतातचि जगी या'; अशा नाट्यपदांची मोहिनी आजही नाट्यरसिकांवर कायम आहे.
- क़ाही नाट्यकृती चिरंतन असतात आणि मर्मबंधातली ठेव म्हणून त्या तितक्याच मायेने जपल्याही जातात. ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकात प्रेममय ठेवीच्या पदानेच रुंजी घातली आहे. गेली नऊ दशके हे नाटक हृदयात हिंदोळे घेत आहे.