Join us

वय वर्षे फक्त ९८... ऑपरेशन झाले 'सक्सेसफुल', ठरले भारतातील सर्वात वृद्ध व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 1:30 PM

मूत्रपिंडावरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जगण्याची दुर्दम्य इच्छा असेल तर वयही त्यात आडवे येऊ शकत नाही, असे म्हटले जाते. अशाच एका ९८ वर्षे वयाच्या ‘तरुणा’ने हे म्हणणे सार्थ करून दाखवले आहे. अनेक व्याधींनी त्रस्त असलेल्या या ज्येष्ठ नागरिकावर नुकतीच मूत्रपिंडातील खडे काढण्याची अवघड शस्त्रक्रिया पार पडली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया होणारी भारतातील ही सर्वांत वृद्ध व्यक्ती ठरली आहे. या व्यक्तीचे नाव आहे शांतिलाल व्होरा...

सायन येथील रहिवासी असलेले ९८ वर्षीय व्होरा यांना अचानक पोटात प्रचंड दुखू लागले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना किडनीचा आजार असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टरांच्या मते, अशा वयात ही प्रक्रिया करणे धोक्याचे असते आणि जर एखाद्या व्यक्तीला सहव्याधी असेल तर धोका जास्त असतो. 

तथापि, व्होरा यांची जगण्याची इच्छाशक्ती आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवल्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाली. १३ वर्षांपूर्वीच त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रिया झाली होती. तसेच मणक्याचे फ्रॅक्चरही झाले होते. त्याबरोबरच उच्च रक्तदाब आणि लिव्हर सोरायसिस या आजारांनीही ते त्रस्त आहेत. व्होरा यांच्यावर मूत्रपिंडातील खडे काढण्याची शस्त्रक्रिया मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात पार पडली.

दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपचार पद्धतीचा नक्कीच फायदा होतो असे यावेळी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. 

व्होरा यांची शस्त्रक्रिया केवळ वयामुळेच नाही, तर १३ वर्षांपूर्वी झालेल्या बायपास शस्त्रक्रियेमुळेही गुंतागुंतीची झाली होती. चाचणी अहवालात त्यांचे क्रिएटिनिन २.८ आणि तीव्र मूत्रपिंडाच्या दुखापतीसह मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यांचे दुखणे कायम राहिल्याने, ओटीपोटाचे सीटी स्कॅन करण्यात आले, ज्यात ६ ते ८ मिमीच्या अडथळ्याच्या डाव्या मूत्रमार्गाचे कॅल्क्युलस दिसून आले. शस्त्रक्रियेत जोखीम असल्याने कुटुंबाला परिस्थिती सांगितली. लेसरच्या साहाय्याने ऑपरेशन केले. -डॉ. विनीत शहा, मूत्रशल्यचिकित्सक

टॅग्स :मुंबई